Sharad Pawar Meets PM Mod: मंगळवारी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आज (बुधवार) शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, भेटीमागचे नेमके कारण काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील राजकीय घडामोडींमध्ये बुधवारी एक महत्वाची भेट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाना सुरुवात झाली आहे.
यापूर्वी शरद पवार यांनी जंतर- मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. नीट परीक्षेतील गैरप्रकारच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांची मोदींसोबत झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपुरात राजभवनासमोर काँग्रेसचे आंदोलन
या भेटीमागे नेमकं कारण काय?
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी (Sharad Pawar Meets Modi) यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि संवादाचा मार्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने ही भेट घेतली असावी.
पवार यांनी याआधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांचा आवाज ऐकून घेतला होता. त्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यात चर्चा होऊन योग्य मार्ग निघावा, यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Latest Political News)
शेतकरी प्रश्नांवरही मोदींसोबत चर्चा
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी, कृषी क्षेत्रातील समस्या आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे मांडण्यात आले आहेत.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, पीडित कुटुंबांना मदत, सिंचन प्रकल्पांना गती आणि पाणी व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रासाठी विविध मागण्या
शरद पवार यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) व्यवस्थेला अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच पीक विमा योजनेतील अडचणी दूर करून नुकसानभरपाई वेळेत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.









