Kerala New CM V. D. Satheesan | केरळच्या (Kerala) राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच केरळला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. काँग्रेसच्या हायकमांडने पक्षाचे नेते व्ही. डी. सतीशन (V. D. Satheesan) यांना केरळचे नवे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आज (14 मे) काँग्रेस पक्षाने व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची केरळचे मुख्यमंत्री म्हणून औपचारिक घोषणा केली आहे.
हेही वाचा – चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीर इशारा; तैवान मुद्द्यावरू राजकीय वातावरण तापलं
कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री?
काँग्रेस पक्षाने नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करताना सांगितलं की, नवनिर्वाचित आमदार आणि मित्रपक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाने दिली.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा व्ही. डी. सतीशन यांना मोठा पाठिंबा होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनेही केली होती. तसेच केरळमध्ये सतीशन यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची मागणी करणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. आययूएमएलने देखील सतीशन यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांडने के. सी. वेणुगोपाल यांच्या नावाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी आणि के. मुरलीधरन यांनी व्ही. डी. सतीशन यांना पाठिंबा दिला.
काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदारांसोबत अनेक बैठका आणि चर्चा केल्यानंतर व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे. तर व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर त्यांचे समर्थक प्रचंड उत्साही आहेत. केरळभर अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
दरम्यान, 2001 पासून व्ही. डी. सतीशन हे केरळमधील परवूर मतदारसंघाचे खासदार आहेत. 2021 मध्ये ते रमेश चेन्नीथला यांच्यानंतर केरळमधील विरोधी पक्षनेते बनले होते. तर 2021 ते 2026 या काळात त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षाचा आवाज उठवून एक खंबीर विरोधी पक्षनेते म्हणून स्वतःला स्थापित केले होते. तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षासाठी सक्रियपणे प्रचार करून पक्षाला विजय मिळवून दिला आहे.











