Prateek Yadav Death Case | माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव (Prateek Yadav) यांचं बुधवारी निधन झालं. त्यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रतीक यादव यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. तर त्यांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार झाली होती. ही रक्ताची गुठळी शरीराच्या खालच्या भागातून वरच्या भागात पसरली होती. त्यानंतर धमन्या आणि फुफ्फुसांमध्ये याचा संसर्ग झाला ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. अशातच आता प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) पोहोचले आहे.
हेही वाचा – यूकेमध्ये अनुपम खेर यांचा डंका! एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा सन्मान
प्रतीक यादव यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची मागणी
प्रतीक यादव यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या ‘डीके फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. प्रतीक यादव यांची हत्या असल्याचं सांगत ही तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने प्रतीक यादव यांच्या संशयास्पद मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मृत्यूचे प्राथमिक कारण हृदय व श्वसनक्रिया बंद पडणे असे सांगितले जात आहे. मात्र, प्रतीक यादव यांच्या मृतदेहावर आढळलेल्या मृत्यूपूर्व जखमा आणि घटनेचे अचानक स्वरूप गंभीर प्रश्न निर्माण करतात. प्रतीक यादव हे त्यांच्या निरोगी जीवनशैलीसाठी ओळखले जात होते आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूची तसेच त्यांच्या शरीरावरील संशयास्पद खुणांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, असं स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रतीक यादव यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
आज लखनौ येथील बैकुंठ धाममध्ये प्रतीक यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि राजकीय वर्तुळातील बडे नेते उपस्थित होते. दरम्यान, प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनामुळे समाजवादी पक्ष परिवारात शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर प्रतीक यांच्या मृत्यूबाबत आता संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.










