Delhi Work From Home Order : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक राज्यातून त्यांना प्रतिसाद मिळतोय .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे सरकरी निर्णय घेतलेले असताना अशातच दिल्ली सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. आता आठवड्यातून दोन दिवस सरकारी कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. गुरुवारी (१४ मे) दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा विचार करून अर्थव्यवस्थेची स्थिरता कायम राखण्यासाठी सरकारने विशेष योजना तयार केली आहे.
खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होमची सूचना
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, खासगी कार्यालयांमध्येही वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने काम होऊ शकते, त्या खासगी कंपन्यांना आठवड्यातून दोन दिवस वर्क फ्रॉम होम देण्याबाबत अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. यावर कामगार विभाग लक्ष ठेवणार आहे.
सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या ताफ्यात कपात
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या ताफ्यात कपात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलमध्ये २० टक्के कपात करण्यात आली आहे. ज्यांना दरमहा २०० ते २५० लिटर इंधन दिले जात होते, त्यामध्ये ही कपात लागू होणार आहे. तसेच एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळला जाणार आहे.
५० टक्के बैठका व्हर्च्युअल पद्धतीने
ज्या अधिकाऱ्यांना वाहन भत्ता दिला जातो, त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास त्यांना १० टक्के इन्क्रिमेंट दिले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. अधिकाधिक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी बस मार्गांचे नियोजन केले जाणार आहे. तसेच सरकारची ५० टक्के बैठका व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोर्टालाही व्हर्च्युअल सुनावणीचे आवाहन
सरकारने न्यायालयालाही शक्य तितक्या सुनावण्या व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी नागरिकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले. पुढील तीन महिन्यांत मोठे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. तसेच पर्यटकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी दिल्लीसाठी विशेष ट्रॅव्हल प्लॅन तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला देशभरातून आणखी कशी साथ मिळते याकडे आता सर्वांचे लक्श लागून आहे.












