Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मार्च- एप्रिलचा ३०० रुपयांचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला असला, तरी काही लाभार्थीना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. चला तर जाणून घेऊयात नेमकं काय कारण आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात मार्च- एप्रिलचा एकत्रित ३००० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. मात्र अजूनही काही लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम आलेली नाही. त्यामुळे अनेक महिलांध्ये संभ्रम निर्माण झाला असून हप्ता नेमका का अडकला, याबाबत चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा: तिरुवनंतपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये आग; मोठी दुर्घटना टळली!
दोन महिन्यांचे पैसे एकत्र
योजनेचा मार्च- एप्रिल महिन्याचा हप्ता काही कारणांमुळे विलंबाने वितरित करण्यात आला होता. त्यामुळे आता दोन महिन्यांचे पैसे एकत्र वर्ग करण्यात येत आहेत. तरीही काही लाभार्थींना रक्कम न मिळण्यामागे विविध तांत्रिक आणि पात्रतेशी संबंधित कारणे असल्याचे समोर आले आहे.
अटी आणि पात्रता निकष
योजनेसाठी राज्य सरकारने काही अटी आणि पात्रता निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी नोकरीतील सदस्य असलेल्या कुटुंबांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
या महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही
याशिवाय आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँक खात्याशी आधार लिंक नसलेल्या महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थींनाही पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एका कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ
एका कुटुंबातील फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ दिला जात असल्याने काही अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसतील, त्यांनी ई-केवायसी, आधार-बँक लिंकिंग आणि पात्रता निकषांची पडताळणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












