PM Modi Iran Warning : होर्मुझची सामुद्रधुनी खुली (Open the strait) करून इराणनं आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करावं आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजे (UAE) वरील हल्ले त्वरित थांबवावेत, असा कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलाय. नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीत UAE राष्ट्रपतींसोबतच्या भेटीदरम्यान इराणला सूचक इशारा (A pointed warning to Iran) दिला.
पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी भारताला दिलेल्या मदतीबद्दल संयुक्त अरब अमिरातीचे आभार मानले. भारत संयुक्त अरब अमिरातीसोबत मिळून काम करेल आणि शांतता, स्थैर्य व सहकार्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध राहील, असं मोदींनी म्हटलं.
हेही वाचा – भारत–नेदरलँड मैत्रीला ऐतिहासिक वळण; स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर, 17 करारांवर शिक्कामोर्तब
पश्चिम आशियातील सद्यस्थितीवरही आपले विचार मांडताना मोदींनी स्पष्ट केलं की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होतोय. त्यामुळं इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करत आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करावं अशी आठवण करून दिली.
यावेळी मोदींनी युएईवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवला. “या कठीण काळात भारत युएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही राहील. भारत UAE ला सर्वतोपरी मदत करेल.” यावेळी पंतप्रधान मोदींनी युएईमधील परिस्थितीवरही आपलं मत व्यक्त केले. भारत युएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही देशाला लक्ष्य करणं हे अस्वीकार्य आहे, असंही मोदींनी सुनावलं.
यादरम्यान, युएई आणि भारत या उभय देशांत काही महत्त्वाचे करार झाले. भारत आणि युएईने सामरिक आणि संरक्षण भागीदारी अंतर्गत अनेक करारांवर स्वाक्षरी केली. पेट्रोलियम साठे आणि एलपीजी पुरवठ्याबाबतही करार झाले. गुजरातच्या वडनगरमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करण्यासाठीही एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याव्यतिरिक्त, आरबीएल बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये 5 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाही यावेळी करण्यात आली.
एकूणच काय, तर इराण-इस्रायल-अमेरिका युद्धात सर्वाधिक झळ सोसावी लागलेल्या UAE वर होणारे हल्ले भारत खपवून घेणार नाही असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, असा सज्जड इशारा मोदींनी UAE च्या भूमीतून इराणला दिला.












