India Bullet Train: भारतीय रेल्वेकडून मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रस्तावित आराखडा सादर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक हाय- स्पीड ट्रेनची पहिली झलक म्हणून एक छायाचित्रही सार्वजनिक करण्यात आले आहे.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर या ट्रेनचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात हाय-स्पीड ट्रेन आकर्षक केशरी आणि पांढऱ्या रंगसंगतीत दिसत आहे. या ट्रेनचा आधुनिक आणि भविष्यवेधी लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा: जास्वंदीचा चहा का प्यावा? वाचा शरीरासाठी होणारे फायदे
पहिली बुलेट ट्रेन
हा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्येही चर्चा सुरू झाली असून, काहींनी तिला ““क्वीन ऑफ स्पीड” अशी उपाधी दिली आहे. हा फोटोच भारतात धरणाऱ्या पहिल्या बुलेट ट्रेनचा संभाव्य लूक असल्याचा दावा केला जात आहे.
रेल मंत्रालयाच्या गेट क्रमांक ४ वर बुलेट ट्रेनशी संबंधित खास छायाचित्रे लावण्यात आली असून, याबाबतची माहिती भारतीय रेल्वेकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. देशातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
हा बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद या 508 किलोमीटर लांबीच्या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर विकसित केला जात आहे. या मार्गावर ट्रेनचा वेग 320 ते 350 किमी प्रतितास इतका अपेक्षित असून, यामुळे मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन तो सुमारे 2 तासांपर्यंत येणार आहे.
महत्त्वाची स्थानके
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात जोडणारा हा मार्ग विकसित केला जात आहे. एकूण सुमारे १२ स्थानके प्रस्तावित असून त्यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, विरार, बोईसर तसेच गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे.
टप्प्याटप्याने सुरू होणार प्रकल्प
बुलेट ट्रेन सेवा एकाच वेळी संपूर्ण मार्गावर सुरू न होता टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला सुरत ते बिलिमोर आणि पुढे वायीपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वापी ते अहमदाबाद आणि ठाणे ते अहमदाबाद असे विस्तार टप्पे राबवले जातील. संपूर्ण मुंबई- अहमदाबाद कॉरिडॉर 2028 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या प्रकल्पासाठी जपानच्या शिंकानसेन E5 तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर भारतात स्वदेशी बुलेट ट्रेन बी28 विकसित केली जात आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि बेंगळुरूतील बीईएमएलच्या सुविधांमध्ये तिचे उत्पादन सुरू आहे. या स्वदेशी ट्रेनचा डिझाइन वेग सुमारे 280 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे आणि मार्च 2027 पर्यंत तिचे प्राथमिक ट्रायल मॉडेल तयार होण्याची अपेक्षा आहे.











