Children Digital Addiction: आजच्या डिजिटल युगात मुलांचं बालपण वेगाने बदलत आहे, खेळ, गप्पा आणि हसण्याऐवजी मोबाईल व स्क्रीन त्यांच्या दैनंदिन जीवनाचा मोठा भाग बनत चालला आहे. लहान वयातच वाढलेला स्क्रिन टाइम त्यांच्या विकासावर परिणाम करू शकतो, असं संशोधनातून समोर आलं आहे.
आजच्या डिजिटल युगात मुलांचे दैनंदिन जीवन झापात्याने बदलत आहे. पूर्वी खेळणी, मैदानी खेळ आणि मित्रांसोबतचा वेळ हे बालपणाचे मुख्य भाग होते, पण आता मोबाईल, टॅबलेट आणि टीव्ही स्क्रिन मुलांच्या आयुष्यात मोठा हिस्सा बनले आहेत. अनेक घरांमध्ये लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवण घालण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे स्क्रीन आता फक्त मनोरंजनाचे साधन न राहता मुलांनाच सततचा साथीदार बनत चालला आहे.
मुलांसाठीच्या व्हिडिओंना इंटरनेटवर प्रचंड प्रतिसाद
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी तयार होणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत. रंगीत अॅनिमेशन, गाणी, नर्सरी रायम्स आणि मजेदार पात्रे यामुळे लहान मुले सहज आकर्षित होतात. अनेक व्हिडिओ कोट्यवधी वेळा पहिले गेले आहेत. यावरून स्पष्ट होते की आजची पिढी खुप कमी वयातच डिजिटल माध्यमांशी जोडली जात आहे.
तज्ज्ञांकडून वाढती चिंता
मुलांच्या वाढत्या स्क्रिन वापराबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक देशांमध्ये मुलांमध्ये मानसिक ताण, चिडचिड, एकटेपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मोबाईल वापरावर निर्बध लागू केले आहेत.
विशेष म्हणजे, आता संशोधन केवळ किशोरवयीन मुलांपुरते मर्यादित राहिलेले नाही. अगदी जन्मानंतरच्या सुरुवातीच्या वर्षातच मुलं स्क्रिनसमोर जास्त वेळ घालवत असल्याने त्याचा त्यांच्या विकासावर काय परिणाम होतो, यावरही अभ्यास सुरू आहेत.
किती स्क्रीन टाइम योग्य?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांनी स्क्रीनचा वापर मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात अनेक मुले दिवसातील अनेक तास मोबाईल किंवा टॅबलेटवर घालवत आहेत. काही देशांतील अहवालांमध्ये प्रीस्कूल वयातील बहुतांश मुलं शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक स्क्रीन वापरत असल्याचे दिसून आले आहे.
सुरुवातीची वर्षे का महत्त्वाची?
बालवयातील पहिली काही वर्षे मेंदूच्या विकासासाठी अत्यंत संवेदनशील असतात.
या काळात मुलं बोलणे, समजून घेणे, भावना व्यक्त करणे आणि सामाजिक वर्तन शिकत असतात.
खेळ, पालकांशी संवाद, गोष्टी ऐकणे आणि प्रत्यक्ष अनुभव या गोष्टी त्यांच्या विकासासाठी महत्त्वाच्या असतात.
सतत स्क्रीनसमोर राहिल्याने या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो.
पालक स्क्रीनकडे का वळतात?
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक पालकांकडे मुलांसाठी पुरेसा वेळ नसतो. कामाचा ताण, प्रवास आणि घरातील जबाबदाऱ्या यामुळे मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी मोबाईल हा सोपा पर्याय वाटू लागतो. दुसरीकडे, डिजिटल प्लॅटफॉर्मही अशा प्रकारे तयार केले जातात की वापरकर्ते अधिकाधिक वेळ त्यावर घालवतील. त्यामुळे मुले पटकन त्या सवयीमध्ये अडकतात.
जास्त स्क्रीन वापराचे परिणाम
जास्त स्क्रीन पाहणाऱ्या मुलांमध्ये भाषिक विकास मंदावणे, एकाग्रतेचा अभाव आणि झोपेच्या समस्या दिसू शकतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीन वापरल्यास झोपेची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय, शारीरिक हालचाली कमी झाल्याने आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
योग्य संतुलन आवश्यक
तज्ज्ञांचे मत आहे की स्क्रीन पूर्णपणे बंद करणे शक्य नाही आणि आवश्यकही नाही. मात्र त्याचा वापर नियंत्रित असणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे, मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे, गोष्टी सांगणे आणि कौटुंबिक संवाद वाढवणे यावर भर द्यावा.






