Rohit Pawar Statement: अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या तपासावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून थेट राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघाताला चार महिने पूर्ण होत असताना अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारांना शोधून काढण्याचे आणि CBI चौकशीबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर नेमकी काय प्रगती झाली याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादीत अंतर्गतची चर्चा वाढल्या; प्रफुल पटेल बैठकीस गैरहजर; नेमकं काय घडलं?
CID तपासावर नाराजी
रोहित पवार यांनी CID च्या कामकाजावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी CID कार्यालयात भेट दिली असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते. तसेच ई-मेल आणि लेखी स्वरूपात पुरावे सादर करून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
CID चा तपास अत्यंत संथ असून या प्रकरणात यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “जर सनदशीर मार्गाने गोष्टी समजत नसतील, तर वेगळ्या पद्धतीने सांगावे लागेल,”असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आदरणीय मुख्यमंत्री साहेब…
अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, CBI चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा तसंच कर्नाटकात नोंद झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 27, 2026
उद्या CID कार्यालयात भेट
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताला उद्या चार महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार पुन्हा एकदा CID कार्यालयात जाणार आहेत. सकाळी 10.30 वाजता ते अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची सविस्तर माहिती घेणार असल्याची माहिती आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
या संपूर्ण घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. तपासाच्या गतीवरून आणि सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांकडून आणखी टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












