• Home
  • राजकारण
  • माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापे! विजयन समर्थकांनी ईडीच्या फोडल्या गाडा, अधिकाऱ्याला काढला पळ
Top News

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापे! विजयन समर्थकांनी ईडीच्या फोडल्या गाडा, अधिकाऱ्याला काढला पळ

ED raids former CM house

ED raids former CM house : केरळच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व आणि अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयएमचे ज्येष्ठ नेते पिनराई विजयन यांच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानाबाहेर डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरासह केरळमधील एकूण १२ महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकल्यानंतर हा वाद उफाळून आला. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या सीपीआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तिरुवनंतपुरमच्या बेकरी जंक्शन परिसरातील विजयन यांच्या भाड्याच्या घराबाहेर धाव घेतली आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू केली.

निदर्शनांचे रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झाले. ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी ईडीच्या पथकाची वाहने अडवून त्यांच्यावर दगडफेक आणि विटांनी हल्ला करत गाड्यांच्या समोरील काचा फोडल्या. या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांना आपल्या गाड्या जागेवर सोडून जागेवरून पळ काढावा लागला.

अत्यंत गुप्त पद्धतीने विजयन यांच्या घरावर पहाटे कारवाई

ईडीनं ही अत्यंत गुप्त आणि मोठी कारवाई पहाटेच्या सुमारास सुरू केली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र जवानांच्या गराड्यात ईडीचे अधिकारी जेव्हा माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या छाप्याच्या वेळी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांचे कुटुंबीय घरातच हजर होते आणि अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करताच संपूर्ण परिसराला वेढा घातला.

उच्च न्यायालयाची मनी लाँड्रिंगच्या चौकशीला कायदेशीर मंजुरी

ईडीची ही कारवाई केरळ उच्च न्यायालयाने कथित राजकीय पे-ऑफ किंवा मासिक पेमेंट प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीला कायदेशीर मंजुरी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच करण्यात आली. उच्च न्यायालयाने कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या खाजगी कंपनीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावल्यामुळे ईडीचा मार्ग मोकळा झाला होता आणि त्यानंतर लगेचच तपास यंत्रणेने हे पाऊल उचलले.

विजयन यांच्या मुलीवर १.७२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी

या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि IT कंपनी ‘एक्झालॉजिक सोल्युशन्स’ आहे. तपास यंत्रणेचा असा आरोप आहे की कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या खाजगी खाण कंपनीने २०१७ ते २०२१ या कालावधीत वीणा विजयन यांच्या कंपनीला सुमारे १.७२ कोटी ते २.७० कोटी रुपयांचे संशयास्पद मासिक पेमेंट केले होते.

सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे, या आयटी कंपनीने खाजगी खाण कंपनीला कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष सेवा किंवा तांत्रिक सल्ला दिला नसतानाही हे कोट्यवधी रुपये देण्यात आले. हा व्यवहार निव्वळ राजकीय संरक्षणासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाचा गैरवापर करून दिलेली लाच किंवा बेकायदेशीर आर्थिक मदत असल्याचा संशय ईडीला आहे, ज्याचा तपास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट अंतर्गत केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts