Cousin Brother Assault Case : बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घडत असलेल्या घटनांमुळे हा बीड आहे की बिहार असा प्रश्न निर्माण झालाच आहे. मात्र या बीड जिल्ह्याने मराठवाड्याचे नाव खराब केले आहे. बीडमधून रोज गुन्हेगारीच्या कोणती न कोणती घटना समोर येतच राहते. आता बीड जिल्ह्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात तब्बल १० तास ताटकळत ठेवण्यात आले, तर दुसरीकडे नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेसह तिच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात अख्खी रात्र जागून काढावी लागली. अगोदरच गंभीर अत्याचाराच्या धक्क्यात असलेल्या चिमुरडीला आणि तिच्या कुटुंबाला पोलीस आणि आरोग्य विभागाच्या या मनमानी कारभारामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत मामेभावाने तोंड रुमालाने आणि हात दोरीने बांधून बळजबरीने अत्याचार केला. या क्रूर घटनेनंतर हादरलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी धाव घेतली. मात्र पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक न्यायाच्या आशेने रात्री ९ वाजता केज पोलीस ठाण्यात पोहोचले. पोक्सो कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये तत्परतेने कारवाई करणे बंधनकारक असताना, पोलिसांनी कमालीची दिरंगाई दाखवली. रात्री ९ वाजता आलेल्या पीडित कुटुंबाची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बल ८ तास लागले. पहाटे ५ वाजता गुन्ह्याची नोंद झाली, तोपर्यंत त्या पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना अख्खी रात्र पोलीस ठाण्यात जागून काढावी लागली.
थिल्लर कारणे पुढे करत पीडितेला १० तास ताटकळत ठेवले
पोलीस ठाण्यातील वनवास संपल्यानंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे सकाळी ११ वाजल्यापासून पीडिता तपासणीची वाट पाहत होती. मात्र, रुग्णालयातील प्रशासनाने कमालीची बेजबाबदार भूमिका घेतली. “स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नाहीत”, “कॉल डॉक्टर वेळेवर आले नाहीत” अशी जुजबी आणि थिल्लर कारणे पुढे करत पीडितेला सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल १० तास रुग्णालयात बसवून ठेवण्यात आले. आधीच शारीरिक आणि मानसिक छळ सोसलेल्या त्या चिमुरडीची आरोग्य विभागाने घेतलेली ही परीक्षा अत्यंत अमानुष होती.
आरोग्य आणि पोलीस यंत्रणेच्या या ढिसाळ कारभारामुळे आता बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर आणि शासकीय रुग्णालयांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












