Nagpur Crime News: राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडलीस आले आहे. एअर फोर्स जवानाच्या पत्नीवर तिच्याच जुन्या मित्राने अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे.
नागपूरमध्ये एअर फोर्स जवानाच्या पत्नीशी संबंधित गंभीर गुन्हामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित महिलेने आपल्या जुन्या शाळेतील मित्रासह त्याच्या साठीदारांवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती धर्मांतराचे आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेने सोनेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी अयाज मादरे आणि त्याचा सहकारी अमीन शेख यांना अटक केली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठी भेट; केंद्राकडून ७३३ कोटींच्या आधुनिकीकरण योजनेला मंजुरी
पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध केले
महिलेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये एका हॉटेलमध्ये भेटीदरम्यान आरोपीने तिच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे समोर आले. त्यानंतर हेच साहित्य व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, आरोपीने तिला धमकावत तब्बल चार लाख रुपये उकळल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, आरोपी विविध प्रकारचे मानसिक दबाव टाकत होता आणि काही अंधश्रद्धेशी संबंधित गोष्टींचा वापर करून तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रकार
या प्रकरणात खंडणी, ब्लॅकमेलिंग, बलात्कार आणि जबरदस्ती धर्मांतर तसेच इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून, तपासाची दिशा ठरवण्यात हे पुरावे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू असून, तपासासाठी एक पथक राज्याबाहेर पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून, पुढील माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.












