Breaking News :
  • Home
  • Top News
  • ढग दाटले, सरी कोसळल्या; पुणे ते कोकण गारव्याच्या सरींमध्ये भिजले
महाराष्ट्र

ढग दाटले, सरी कोसळल्या; पुणे ते कोकण गारव्याच्या सरींमध्ये भिजले

Pune Rain News

Pune Rain News: पुण्यात आज दुपारपासून आकाश ढगाळलेले होते आणि सुमारे चार वाजताच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा आणि कोथरुडसह अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्या.

राज्यात काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र स्वारगेट परिसरातील मित्रमंडळ चौकात पाणी साचल्याने रस्त्यांना तात्पुरते तलावाचे स्वरूप आले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. पिंपरी- चिंचवड परिसरातही हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली असून अजूनही मान्सून पूर्ण ताकदीने दाखल झालेला नाही.

हेही वाचा: चहापानावर बहिष्कार, सभागृहात हल्लाबोल; पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारची वाढणार डोकेदुखी?

सातारा जिल्ह्यात

सातारा जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. परळी खोऱ्यासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रखडलेली मशागतीची कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पेरणीपूर्व तयारीला या पावसामुळे गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रायगड जिल्ह्यात

रायगड जिल्ह्यातील महाड परिसरातही सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा वाढत असल्याने खेड येथे शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांनी पर्जन्यवृष्टीसाठी धार्मिक विधी केले. जांभळेश्वर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून पावसासाठी प्रार्थना करण्यात आली. गावकऱ्यांनी लवकर पाऊस पडावा अशी मनोकामना व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता आरतीने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts