Lucknow Fire: लखनऊमध्ये भीषण अग्नितांडवाने हाहाकार उडाला आहे. कोचिंग सेंटर सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने अनेक विद्यार्थी अडकले, तर या दुर्घटनेत सुमारे 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथे सोमवारी एका हृदयद्रावक घटना घडली. अलीगंज परिसरातील बहुमजली इमारतीत अचानक आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
आग लागल्यानंतर काही मिनिटांत धूर
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीत कोचिंग क्लासेस, गेमिंग झोन तसेच इतर व्यावसायिक आस्थापना सुरू होत्या. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धूर आणि आगींनी संपूर्ण परिसर व्यापला. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आत अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली.
हेही वाचा: शिंदे गटाची ताकद वाढली; सहा खासदारांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न
जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या खिडक्या आणि गच्चीवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी उंचावरून उड्या मारल्याने गंभीर दुखापती झाल्या. अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असले तरी काहींना आपले जीव गमवावा लागला.
रुग्णालयात दाखल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींचे वय साधारण 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाला भेट
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारने शोक व्यक्त
दरम्यान, या दुदैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेश सरकारने शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. लखनऊमधील ही दुर्घटना राज्यातील अलीकडील काळातील सर्वात मोठ्या अग्नितांडवांपैकी एक मानली जात आहे.




