Eknath Shinde: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात उपचार घेत असतानाही घेतला आहे. सलाईन लावलेले असतानाही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकण परिसरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि नद्यांच्या पातळीत वाढ होणे अशा परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. विशेषतः रायगड आणि कोकण भागात पूरस्थिती अधिक गंभीर झाली असून प्रशासनाची यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
हेही वाचा: मुंबई–पुणे ट्रेन सेवा ठप्प! कोणत्या गाड्या रद्द, कोणत्या डायव्हर्ट? जाणून घ्या बदलेलं वेळापत्रक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात उपचार (Eknath Shinde)
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रुग्णालयात उपचार घेत असतानाही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तब्येत बरी नसतानाही त्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबई, कोकण आणि रायगडमधील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या
शिंदे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, अडचणीत सापडलेल्या नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी, बचावकार्य वेगाने राबवावे आणि कोणत्याही परिस्थितीत मदतीत विलंब होऊ नये. तसेच सर्व मंत्र्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील पूरस्थितीवर विशेष लक्ष
रायगड जिल्ह्यातील पूरस्थितीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी मंत्री भरत गोगावले, योगेश कदम आणि उदय सामंत यांना दिले आहेत. महाड आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा
मुंबईतील परिस्थितीबाबतही शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी, पाणी साचलेले भाग, झाडे कोसळण्याच्या घटना आणि दरड कोसळण्याच्या धोक्याच्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. धोकादायक झाडे तातडीने हटवावीत, मॅनहोल्सची तपासणी करावी आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्रिय ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कामकाज सुरू ठेवल्याचे समोर
दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असतानाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कामकाज सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. त्यांच्या दोन्ही हातांवर सलाईन लावलेले असतानाही ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेताना दिसले. त्यामुळे राज्यातील परिस्थितीबाबत सरकार किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मंत्री भरत गोगावले तातडीने घटनास्थळी रवाना
दुसरीकडे, रायगडमध्ये दरड कोसळल्याच्या घटनांनंतर मंत्री भरत गोगावले तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून प्रशासन पूर्ण ताकदीने कामाला लागले आहे.











