Khawadya Kada : संभाजीनगरचा खवडा कडा, हा कडा जणू मृत्यू कडा, असाच चर्चेत आलाय, कारण कालच इथून उड्या मारून संपूर्ण कुटुंब संपलं, मात्र तिथं फक्त एका कुटुंबाचाच जीव गेला नाहीये, तर वर्षभरातील आकडेवारी ऐकून या कड्याला कडा म्हणायचं की सुसाईड पॉइंट म्हणायचं हाच प्रश्न तुम्हालाही पडेल, कारण या संभाजीनगरच्या खवड्या कड्यावरून उड्या मारून 1 वर्षात 13 जणांनी जीव गमावला आहे, पण सर्वात मोठा सवाल हा आहे की, एवढ्या आत्महत्या होऊन प्रशासन अजून झोपलंय का? अजूनही प्रशासनानं या ठिकाणी रेलिंग का लावलं नाही? काही सुरक्षा व्यवस्था का केली नाही?
खवड्या कड्यावरून उड्या मारून वर्षभरात 13 जणांचा मृत्यू; अजूनही रेलिंग नाही ( Khawadya Kada Suicide Cases )
छत्रपती संभाजीनगरमध्ये खवड्या डोंगरावर ( Khawadya Kada ) 21 ऑगस्टला काय घडलं, हे जर तुम्ही ऐकलं असेल, तर तुम्हालाही हळहळ वाटली असेल. एका १९ वर्षांच्या पोराने एका आयफोनसाठी डोंगराच्या कड्यावरून दरीत उडी घेतली आणि त्याला वाचवायला गेलेल्या आई-वडिलांनीही त्याच्याच पाठीमागे दरीत झेप घेतली. एका सेकंदात अख्खं चांदगुडे कुटुंब संपलं.
हे ऐकायला जितकं सुन्न करणारं आहे, तितकंच ते एका भयंकर वास्तवाची जाणीव करून देणारं आहे, . ही संभाजीनगरची घटना म्हणजे आजच्या तरुण पिढीच्या डोक्यात, त्यांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या हातातील त्या चकाचक स्क्रीनच्या पलीकडच्या आभासी जगात काय जीवघेणा खेळ चालू आहे, याचं फक्त एक लक्षण आहे. आजचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलं, त्यांच्या जीवापेक्षा एका लाख रुपयांच्या फोनची किंमत जास्त कशी काय असू शकते? नेमकं काय चाललंय आजच्या मुलांच्या डोक्यात? मुलं इतकी टोकाची पाऊले उचलायला का तयार झाली आहेत? असे असंख्य सवाल उपस्थित होतायत..
सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेटस अँक्झायटी म्हणजेच प्रतिष्ठेची भीती. आज इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपल्या मुलांसमोर एक असं जग उभं केलंय जे पूर्णपणे खोटं आणि आभासी आहे. इन्स्टाग्राम रिल्स किंवा युट्युब शॉर्ट्स उघडले की, तिथे त्यांच्याच वयाची मुलं महागड्या गाड्यांमधून फिरताना दिसतात, ब्रँडेड कपडे घालताना दिसतात आणि त्यांच्या हातात असतो सर्वात महागडा आयफोन. हे रोज सकाळी, दुपारी, रात्री पाहिल्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या डोक्यात एक प्रचंड न्यूनगंड तयार होतो. त्यांना वाटायला लागतं की, जर माझ्याकडे या वस्तू नसतील, तर माझ्या मित्रांमध्ये माझी काहीच किंमत नाही. मोबाईल आता फक्त फोन राहिलेला नाही, तो आजच्या पिढीसाठी त्यांची लायकी ठरवणारं लायसन्स बनलाय. जेव्हा एखादा मुलगा घरात आयफोनचा हट्ट करतो, तेव्हा तो फक्त फोन मागत नसतो, तर तो या आभासी जगात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भीक मागत असतो.
हेही वाचा : राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधी विद्यार्थी संघटनांमध्ये वाद; NSUI-ABVPमध्ये नेमकं काय घडलं?
खवड्या कडा ठरतोय ‘मृत्यू कडा’; प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ( Khawadya Kada )
यात दुसरा सगळ्यात मोठा धोका निर्माण झालाय, तो म्हणजे ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’चा, म्हणजेच प्रत्येक गोष्ट एका सेकंदात हवी असण्याचा. आजच्या डिजिटल युगाने मुलांना थांबायला शिकवलंच नाही. दोन मिनिटांत मॅगी मिळते, एका क्लिकवर जेवण दारात येतं, रिल स्क्रोल केलं की दर सेकंदाला नवीन करमणूक मिळते. या सवयीमुळे मुलांच्या मेंदूला ‘नाही’ ऐकण्याची सवयच राहिलेली नाही. जेव्हा खऱ्या आयुष्यात आई-वडील पैशांची अडचण सांगतात, तेव्हा मुलांचा हा ‘इन्स्टंट’ मेंदू तो नकार पचवूच शकत नाही. नकार मिळाला की त्यांना वाटतं सगळं जगच संपलं. संभाजीनगरच्या त्या पोराचे शेवटचे शब्द काय होते माहितीये का? तो म्हणाला होता, “आता कोणत्याही गोष्टीवर काहीच सोल्यूशन उरलेलं नाही, फक्त हे एकच सोल्यूशन आहे.” विचार करा, एका फोनसाठी त्याला आयुष्यात दुसरं कोणतंही सोल्यूशन दिसत नव्हतं. ही मानसिक अवस्था एका रात्रीत तयार होत नाही, ही वर्षानुवर्षे स्क्रीनसमोर बसून मेंदूची विचार करण्याची क्षमता गोठल्यामुळे होते.
आता या संपूर्ण खेळात एक छुपा व्हिलन आहे, ज्याला आपण ‘अल्गोरिदम’ म्हणतो. सोशल मीडिया कंपन्यांनी हे ॲप्स अशा प्रकारे बनवले आहेत की, जितका जास्त वेळ तुम्ही स्क्रीनवर घालवाल, तितका त्यांचा फायदा होतो. रिल्सवर मिळणारे लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज यामुळे मुलांच्या मेंदूतून ‘डोपामाइन’ नावाचं केमिकल रिलीज होतं, जे त्यांना तात्पुरता आनंद देतं. जेव्हा हे मुलं फोन बाजूला ठेवतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील डोपामाइनची लेव्हल ढासळते आणि त्यांना भयंकर चिडचिड, अस्वस्थता आणि नैराश्य यायला लागतं. जसं एखाद्या गर्दुल्ल्याला ड्रग्स न मिळाल्यावर तो वेडापिसा होतो, तसंच काहीसं आजच्या मुलांचं या डिजिटल जगाबाबत झालंय. संभाजीनगरचा तो मुलगा गेल्या वर्षीही याच फोनच्या हट्टापायी त्याच डोंगरावर गेला होता, हे सिद्ध करतं की हे डिजिटल व्यसन किती भयंकर पातळीवर पोहोचलं होतं.
यात सर्वात शेवटची आणि दुःखद गोष्ट म्हणजे संवाद संपलाय. आज एकाच घरात, एकाच सोफ्यावर चार माणसं बसलेली असतात, पण चारही जण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पूर्वी मनात काही आलं, नैराश्य आलं की मुलं मित्रांकडे किंवा आई-वडिलांकडे मन मोकळं करायची. आज मुलांचे सोशल मीडियावर पाच-पाच हजार मित्र आहेत, पण रात्री जेव्हा आत्महत्येचा विचार डोक्यात येतो, तेव्हा हक्काने फोन करावा असा एकही खरा मित्र त्यांच्या आयुष्यात शिल्लक राहिलेला नाही. मुलं बोलायचं विसरली आहेत आणि आई-वडील आपल्या मुलांच्या स्क्रीनच्या मागे दडलेला त्यांचा एकटेपणा ओळखण्यात अपयशी ठरत आहेत. घरात पैशांची चणचण असणं ही भारताच्या ९० टक्के कुटुंबांची कहाणी आहे, पण ती चणचण पाहून जर मुलांच्या मनात कृतज्ञतेऐवजी चीड आणि बंडखोरी निर्माण होत असेल, तर समजून जा की पालकांच्या संवादात आणि संस्कारात कुठेतरी खूप मोठी दरी निर्माण झाली आहे.
खवड्या कड्यावर आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढली ( Khawadya Kada )
ही फक्त एका कुणाल चांदगुडेची किंवा एका कुटुंबाची गोष्ट नाही. अशा शेकडो घटना आपल्या अवतीभवती रोज घडत आहेत, ज्या कधी कधी बातम्यांमध्येही येत नाहीत. जर आपण आताच जागे झालो नाही, तर या डिजिटल जगाची दरी अशीच आपल्या घरातली तरुण मुलं आणि त्यांचे जीव गिळत राहील. मुलांना मोबाईलच्या पलीकडचं वास्तव जग दाखवण्याची, त्यांना कष्टाची आणि पैशांची किंमत समजून सांगण्याची वेळ आता आली आहे. मोबाईल हे फक्त एक साधन आहे, ते तुमचं आयुष्य किंवा तुमची लायकी ठरवू शकत नाही, हे आपल्याला आपल्या मुलांना ठणकावून सांगावं लागेल. संभाजीनगरची ही दुर्घटना आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा आणि भयानक धडा आहे, की स्क्रीनच्या प्रकाशात जगताना नात्यांमधील ओलावा आणि आयुष्याची खरी किंमत अंधारात हरवून जाता कामा नये.









