Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कृती सेनॉनच्या ‘त्या’ लूकवरून कंगना भडकली; राहुल गांधींची एन्ट्री, नेमका वाद काय?
मनोरंजन

कृती सेनॉनच्या ‘त्या’ लूकवरून कंगना भडकली; राहुल गांधींची एन्ट्री, नेमका वाद काय?

Kriti Sanon Outfit Row
7
Kriti Sanon Outfit Row: कृती सेनॉनच्या एका लूकवरून कंगना रणौत भडकली आहे. यावर कृतीनेही दिलं सडेतोड उत्तर आणि आता राहुल गांधींनी घेतली तिची बाजू घेतली असून सोशल मीडियावर रंगलेला हा वाद नेमका काय आहे? जाणून घेऊयात.

रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील (Rakshabandhan Ad) कृती सेनॉनच्या पेहरावावरून (Kriti Sanon Outifit) सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) टीकेनंतर कृतीने दिलेल्या सडेतोड उत्तराला राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पाठिंबा दिल्याने हा वाद थेट राजकीय वर्तुळात पोहोचला आहे. नेमका वाद काय आहे? कंगनाने कृतीला काय सुनावलं आणि राहुल गांधींनी कोणती भूमिका घेतली? जाणून घेऊया.

रक्षाबंधन म्हणजे भाऊ- बहीण, प्रेम आणि संरक्षणाचा सण. मात्र यंदा याच सणाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीने सोशल मीडियावर वेगळाच वाद पेटवला आहे. अभिनेत्री कृती सेनॉनच्या पेहरावावरून सुरू झालेली चर्चा आता कंगना रणौत विरुद्ध कृती सेनॉन आणि त्यानंतर थेट राहुल गांधी विरुद्ध कंगना रणौत अशा राजकीय वळणावर पोहोचली आहे. (Kriti Sanon Raksha Bandhan ad)

नेमका वाद कुठून सुरू झाला? (Kriti Sanon Outfit Controversy)

एका प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँडने रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक डिजिटल जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत कृती सेनॉन आधुनिक इंडो-वेस्टर्न लूकमध्ये (Kriti Sanon’s Look) दिसली. ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट असा तिचा पेहराव होता.

जाहिरातीत रक्षाबंधनाचा संदर्भ असतानाही असा आधुनिक आणि बोल्ड पेहराव का वापरण्यात आला, असा सवाल काही सोशल मीडिया युजर्सनी उपस्थित केला. त्यातच कृतीने आपल्या पाळीव कुत्र्यालाही राखी बांधल्याचे दाखवल्यात आल्याने वाद आणखी वाढला.

काही नेटकऱ्यांनी हा सणाच्या पारंपरिक स्वरूपाचा अपमान असल्याचा आरोप केला. पाहता पाहता कृती सेनॉन सोशल मीडिया ट्रोलिंगची शिकार झाली.

कृतीच्या पोस्टवर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

या वादात भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिने उडी घेतली आणि प्रकरणाला आणखी हवा मिळाली. यावेळी कंगनाने सोशल मीडिया पोस्टमधून कृतीच्या पेहरावावर जोरदार टीका केली. भारतीय महिलांकडे साडी, लेहेंगा-चोली, सलवार-कमीज किंवा अगदी जीन्स-टी-शर्टसारखे अनेक पर्याय असताना पवित्र सणाच्या दिवशी असा पेहराव करण्याची गरज काय, असा सवाल तिने उपस्थित केला.

कंगनाने जाहिरातीच्या संकल्पनेवरही प्रश्न उपस्थित करत ती “Intentionally Creepy” असल्याचे म्हटले.

कंगनाच्या या टीकेनंतर सोशल मीडियावर कृती सेनॉनच्या जाहिरातीवरून सुरू असलेली चर्चा आणखी तीव्र झाली.

social media post
social media post

कृती सेनॉनचं कंगनाला दिले सडेतोड उत्तर

मात्र कृती सेनॉनने या टीकेवर गप्प बसण्याऐवजी आपली भूमिका स्पष्ट केली. कृतीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कोणाचेही थेट नाव न घेता सणांचे महत्त्व हे कपड्यांवर अवलंबून नसल्याचे म्हटले.

तिच्या मते, सणांची खरी भावना ही आपल्या मनात आणि परंपरांमध्ये असते. काळानुसार भारतीय फॅशनमध्ये बदल झाले आहेत. मात्र आजही एखाद्या महिलेच्या संस्कृतीचा आणि चारित्र्याचा अंदाज तिच्या कपड्यांची लांबी किंवा नेकलाईन पाहून घेतला जातो, ही बाब दुर्दैवी असल्याचे तिने म्हटले.

कृतीने आपल्या पोस्टमधून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. संस्कृती आणि परंपरा कपड्यांमध्ये नाही, तर माणसाच्या विचारांत आणि मनात असतात.

रक्षाबंधन हा प्रेम आणि संरक्षणाचा बंध असल्याचे सांगताना तिने आपल्या बहिणी नुपूरसोबतच्या नात्याचाही उल्लेख केला. तसेच पाळीव प्राणीही कुटुंबाचा भाग असल्याने त्यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यात गैर काय, असा सवाल तिने केला.

नुपूर सेनॉनही वादात उतरली

कृतीची बहीण नुपूर सेनॉन हिनेही या वादावर प्रतिक्रिया देत कंगनाच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

दुसरी महिला काय कपडे घालते याचा कोणाला इतका त्रास का व्हावा, असा सवाल नुपूरने उपस्थित केला. एखाद्या महिलेच्या कपड्यांपेक्षा तिच्या विचारांकडे आणि व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याची गरज असल्याचा तिचा सूर होता.

राहुल गांधींची कृती सेनॉनला समर्थन

कृती सेनॉन आणि कंगना रणौत यांच्यातील हा वाद बॉलिवूडपुरता मर्यादित राहील असं वाटत असतानाच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात थेट भूमिका घेतली.

राहुल गांधी यांनी कृती सेनॉनच्या पोस्टचा स्क्रीनशॉट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

महिलांनी काय परिधान करावं, आयुष्यात काय करावं किंवा कुठे जावं, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. महिलांनी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा वापर केल्यास त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणं किंवा मानसिक त्रास देणं थांबवलं पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

यासोबतच राहुल गांधींनी #SmashThePatriarchy हा हॅशटॅगही वापरला.

वाद आता संस्कृती विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य?

या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सणांच्या जाहिरातींमध्ये आधुनिकता किती असावी आणि पारंपरिक संस्कृतीची सीमा नेमकी कुठे आखायची?

कंगना आणि तिच्या भूमिकेला समर्थन देणाऱ्यांच्या मते, भारतीय सणांचं सादरीकरण करताना सांस्कृतिक संवेदनशीलता जपली पाहिजे. जाहिरातदारांनी केवळ लक्ष वेधण्यासाठी सणांच्या भावनेला धक्का देणारी मांडणी करू नये, असा युक्तिवाद केला जात आहे.

दुसरीकडे, कृती सेनॉन आणि तिच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांचा मुद्दा वेगळा आहे. एखाद्या महिलेच्या कपड्यांवरून तिची संस्कृती, चारित्र्य किंवा सणांबद्दलचा आदर ठरवता येत नाही. फॅशन बदलत असते आणि परंपराही काळानुसार नव्या स्वरूपात पुढे जातात, असं या वर्गाचं म्हणणं आहे.

बॉलिवूडच्या जाहिरातीपासून राजकीय संघर्षापर्यंत…

विशेष म्हणजे, एका दागिन्यांच्या जाहिरातीपासून सुरू झालेला हा वाद आता केवळ कृती सेनॉन विरुद्ध कंगना रणौत एवढ्यावर थांबलेला नाही.

कंगना ही भाजपची खासदार आहे, तर राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या राजकीय विचारसरणींची छाया या वादावर पडली आहे.

एकीकडे महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे भारतीय संस्कृती आणि परंपरांचा मुद्दा पुढे केला जात आहे. म्हणूनच आता प्रश्न केवळ “कृतीने काय घातलं?” एवढाच राहिलेला नाही.

खरा प्रश्न आहे. महिलेच्या कपड्यांवरून तिची संस्कृती ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि सणांच्या नावाखाली वैयक्तिक स्वातंत्र्याला मर्यादा घालता येतील का?

या प्रश्नांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, कृती सेनॉन, कंगना रणौत आणि राहुल गांधी यांच्या भूमिकांमुळे हा वाद पुढे आणखी कोणतं वळण घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts