National Teachers Award: दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशातील उल्लेखनीय शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव केला जातो. मात्र हा सन्मान नेमका कोणाला मिळतो, शिक्षकांची निवड कशी होते जाऊन घेऊयात आजच्या खास लेखातून
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक, वर्गात केवळ धडे शिकवण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, शिक्षणात नवे प्रयोग करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांचा केंद्र सरकारकडून गौरव केला जातो. यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन्मान म्हणजे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिक्षक दिन ५ सप्टेंबर २०२६ रोजी, शनिवारी साजरा केला जाणार आहे. याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जातो. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची अधिकृत दखल घेण्याबरोबर देशातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरतो.
हेही वाचा: समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; टोलच्या बदल्यात सुविधांचा अभाव?
पुरस्कारासाठी कोण पात्र ठरू शकते?
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्कारासाठी नामांकन करता येते. शिक्षक स्वतःही आपले नामांकन दाखल करू शकतात. याशिवाय संबंधित शैक्षणिक संस्था किंवा त्यांचे प्रमुख शिक्षकाचे नाव पुढे पाठवू शकतात. सहकारी शिक्षकांनाही पात्र शिक्षकाचे नामांकन करण्याची संधी असते.
नामांकन प्रक्रियेत शिक्षकांनी आपल्या कामाची सविस्तर माहिती देणे आवश्यक असते. अध्यापनातील नवीन पद्धती, विद्यार्थ्यांसाठी केलेले उपक्रम, शैक्षणिक उपलब्धी, सामाजिक योगदान आणि इतर उल्लेखनीय कामांचा तपशील अर्जासोबत सादर केला जातो.
निवड प्रक्रिया कशी असते?
पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांची थेट अंतिम निवड केली जात नाही. त्यासाठी विविध स्तरांवर छाननी आणि मूल्यांकन केले जाते. सुरुवातीला स्थानिक किंवा जिल्हास्तरावर अर्जांची तपासणी होते. त्यानंतर राज्य किंवा संबंधित संस्थेच्या पातळीवर निवड प्रक्रिया पार पडते.
यानंतर अंतिम टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र समितीकडून उमेदवारांच्या कामाचे मूल्यांकन केले जाते. शिक्षकाने शिक्षण क्षेत्रात केलेला प्रत्यक्ष बदल, विद्यार्थ्यांवर झालेला परिणाम, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि एकूण कामगिरी यांसारख्या बाबींचा विचार केला जातो.
पुरस्कारामध्ये काय मिळते?
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा विशेष समारंभात गौरव केला जातो. त्यांना पुरस्काराचे प्रमाणपत्र, पदक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाते.
या पुरस्काराचे महत्त्व केवळ मिळणाऱ्या सन्मानापुरते मर्यादित नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.






