Teachers Day 2026: गुरुपौर्णिमेबद्दल अनेकांना माहिती आहे; मात्र शिक्षक दिन ५ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आणि गुरुपौर्णिमा व शिक्षक दिनामध्ये नेमका काय फरक आहे? या दिवसांचे महत्त्व आणि त्यामागील रंजक इतिहास जाणून घेऊया.
गुरू आणि शिक्षक ( Guru And shikshak ) आपल्या आयुष्यात ज्ञानासोबतच योग्य दिशा, संस्कार आणि आत्मविश्वास देतात. गुरुपौर्णिमेप्रमाणेच शिक्षक दिनही ज्ञान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा खास दिवस आहे. आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो आणि या दिवसाचे महत्व काय आहे? जाणून घेऊया.
शिक्षक दिन का साजरा केला जातो? (Why Teachers Day is Celebrated)
भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (5 September Teachers Day) साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
हेही वाचा: ज्यांच्या शिकवणीतून घडतं भविष्य, त्या गुरुवर्यांना मराठीतून द्या शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
डॉ. राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. शिक्षक क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि चाहत्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते? ( Who Dr Sarvepalli Radhakrishnan)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते ते प्रख्यात तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या मते, शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान देणारा नसतो, तर त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो.
शिक्षक दिनाचे महत्त्व काय?
शिक्षक दिन (Teachers Day History) हा केवळ शिक्षकांना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही. आपल्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे.
शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच शिस्त, मेहनत, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार शिकवतात. विद्यार्थ्यांच्या चुका सुधारून त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्याचे काम शिक्षक करतात.
आई-वडिलांनंतर मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये शिक्षकांचा समावेश होतो. त्यामुळे शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे.
गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये काय फरक?
गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन(Gurupurnima and Teachers Day) हे दोन्ही दिवस ज्ञान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, दोन्ही दिवसांचे स्वरूप वेगळे आहे.
गुरुपौर्णिमा ही प्राचीन गुरू-शिष्य परंपरेशी जोडलेली आहे. या दिवशी आध्यात्मिक आणि जीवनाचे ज्ञान देणाऱ्या गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.
तर शिक्षक दिन हा आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षक या दिवसाचे केंद्रस्थानी असतात.
शिक्षक दिन कसा साजरा केला जातो?
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना फुले, शुभेच्छापत्रे आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात. तसेच अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, निबंध स्पर्धा आणि शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. काही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांची भूमिका देखील पार पाडतात. या सर्व उपक्रमांमागचा मुख्य उद्देश एकच असतो. शिक्षकांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानणे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे.
शिक्षकांचे योगदान शब्दांत मावणारे नाही
शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणतात. कधी कठोर शिस्त लावून, तर कधी मायेची थाप देऊन ते विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. परीक्षेतील गुणांपेक्षा आयुष्यातील चांगला माणूस बनणे महत्त्वाचे आहे, हे शिक्षक आपल्या कृतीतून शिकवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबासोबतच शिक्षकांचेही मोठे योगदान असते.
“गुरू ज्ञान देतात, शिक्षक दिशा देतात आणि दोघे मिळून आयुष्य घडवतात.” म्हणूनच या शिक्षक दिनी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे मनापासून आभार मानूया आणि त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!







