Gauri Avahan 2026: गणेशोत्सवाच्या उत्साहात आता घराघरांत गौराईच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. आज १७ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाणार असून, शुभ मुहूर्तापासून मानाच्या नैवेद्यापर्यंत आणि विसर्जनाच्या तारखेपर्यंत जाणून घ्या या उत्सवाची A टू Z माहिती.
“गौराई आली माहेराला… आली गं गौराई आली… सोन्याच्या पावलांनी माहेराला आली…” या पारंपरिक गजरात आज गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी अनेक घरांमध्ये गौराईचे आगमन (Gauri Avahan) होणार असून १९ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. घराची सजावट, रांगोळी, औक्षण आणि विविध पारंपरिक पद्धतींनी ज्येष्ठागौरीचे स्वागत (Jyeshtha Gauri 2026) केले जाते. मात्र, गौराईचे आवाहन नेमक्या कोणत्या वेळी करावे? तिच्यासाठी कोणता नैवद्य केला जातो? विसर्जन कधी होणार? आणि या उत्सवाचे धार्मिक महत्व काय आहे? जाणून घेऊया.
ज्येष्ठागौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त (Gauri Puja Muhurat)
पंचांगातील माहितीनुसार, अनुराधा नक्षत्रात ज्येष्ठागौरीचे आवाहन करण्याची परंपरा आहे. यंदा गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत गौरीचे आवाहन करण्याचा शुभ काळ असल्याचे दिले आहे. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल.
गौराईचे घरात स्वागत करताना अनेक कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतींचे पालन केले जाते. रांगोळी काढणे, हळद- कुंकू लावणे, औक्षण करणे तसेच मंगलवाद्यांच्या निनादात गौराईचे स्वागत करण्याची प्रथा आहे.
काही घरांमध्ये गौराईला घरातील धान्य, धन- संपत्ती आणि स्वयंपाकघर दाखवण्याचीही परंपरा आहे. या प्रथा मात्र प्रत्येक कुटुंबाच्या कुलाचार आणि स्थानिक परंपरेनुसार वेगवेगळ्या असू शकतात.
तीन दिवस कसा साजरा होणार गौराई उत्सव?
ज्येष्ठागौरीचा उत्सव साधारणपणे तीन दिवसांचा असतो. या तीन दिवसांमध्ये आवाहन, पूजन आणि विसर्जन असे विविध विधी केले जातात.
17 सप्टेंबर – ज्येष्ठागौरी आवाहन: गौराईचे घरात स्वागत करून त्यांची स्थापना केली जाते.
18 सप्टेंबर – ज्येष्ठागौरी पूजन: या दिवशी मुख्य पूजा, नैवेद्य, सवाष्ण आणि कुमारिका पूजन तसेच हळदी-कुंकू यांसारखे कार्यक्रम केले जातात.
19 सप्टेंबर – गौरी विसर्जन: पूजेनंतर परंपरेनुसार गौराईला भावपूर्ण निरोप देत विसर्जन केले जाते.
गौराईला कोणता नैवेद्य दाखवला जातो?
ज्येष्ठागौरीच्या नैवेद्याची एकच निश्चित पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात आढळत नाही. घरची परंपरा, कुलाचार आणि प्रदेशानुसार नैवेद्यातील पदार्थ बदलतात.
मात्र पुरणपोळीला गौराईच्या नैवेद्यात विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय विविध प्रकारच्या भाज्या आणि पारंपरिक पदार्थांचा समावेश केला जातो.
गौराईच्या नैवेद्यात सामान्यतः पुढील पदार्थ केले जातात:
पुरणपोळी
विविध भाज्यांची भाजी किंवा 16 भाज्यांचा नैवेद्य
कटाची आमटी
वरण-भात
अळूवडी
खीर
लाडू किंवा करंजी
फळे
पंचामृत
घरच्या परंपरेनुसार या पदार्थांमध्ये बदल केला जाऊ शकतो.
ज्येष्ठागौरी पूजनाचे धार्मिक महत्त्व काय?
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठागौरीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घरामध्ये सुख-समृद्धी, धनधान्य, आरोग्य आणि सौख्य टिकून राहावे, या श्रद्धेने गौराईचे आवाहन आणि पूजन केले जाते.
गणेशोत्सवाच्या काळात साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून त्याला महाराष्ट्राच्या कौटुंबिक आणि सांस्कृतिक परंपरेतही विशेष स्थान आहे. घरातील महिला पारंपरिक पद्धतीने गौराईची सजावट, पूजा आणि नैवेद्याची तयारी करतात. अनेक ठिकाणी नातेवाईक आणि आप्तेष्टांना बोलावून हळदी-कुंकू आणि स्नेहमेळावेही आयोजित केले जातात.




