सचिन राणे | वाशिम प्रतिनिधी
Washim Farmer Death : वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तांदळी येथे शेतात सोयाबीनच्या सोंगणीचे काम सुरू असताना अचानक वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास घडली. राहुल विष्णू राठोड (वय अंदाजे ३० वर्षे) असे मृत्यू झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने तांदळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोयाबीनच्या शेतात काम करताना अंगावर कोसळली वीज ( Washim Farmer Death )
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राठोड ( Rahul Rathod ) हा आपल्या आई-वडिलांसोबत शेतात सोयाबीनच्या सोंगणीचे काम करीत होते. खरीप हंगामातील पिकाची काढणी सुरू असतानाच दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि परिसरात विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी राहुल याचे आई-वडील शेतातील खोपडीवर होते, तर राहुल हे खोपडीखाली उभे होते. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत राहुल राठोड गंभीररीत्या भाजले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या आई-वडिलांवर मोठा आघात झाला. सुदैवाने राहुल याचे आई-वडील या दुर्घटनेत बचावले. मात्र, त्यांच्या डोळ्यांसमोर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना राहुल राठोड हे आपल्या शेतातील सोयाबीनची सोंगणी करीत होते. कुटुंबासोबत शेतातील कामात व्यस्त असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. काही क्षणांतच घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर तांदळी गावात शोककळा पसरली असून, राहुल यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल राठोड हे कुटुंबातील कर्त्या व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे राठोड कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. राहुल यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा : सत्तरीतलं प्रेम, आजीनं केला आजोबांचा गेम मृतदेह जाळला आणि शेतात पुरला!







