Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • शेतकऱ्याच्या मिरचीला ₹2.50, टोमॅटोला ₹4! पण iPhoneसाठी रांगा; हा कसला विरोधाभास?
ऍग्रो स्पेशल

शेतकऱ्याच्या मिरचीला ₹2.50, टोमॅटोला ₹4! पण iPhoneसाठी रांगा; हा कसला विरोधाभास?

Marathwada Drought
12

Marathwada Drought : मराठवाडा दुष्काळाने होरपळला आहे…दररोज पडणारा ऊन फक्त जमिनीतील पाणी शोषत नाहीये…तर शेतकऱ्यांचं रक्त देखील शोषत आहे….मुला बाळांना दिवाळीला कपडे न घेता, बायकोला एकही साडी घेऊन न देता, जे काही पैसे शेतकऱ्याने वाचवले होते…ते पैसे त्याने मातीत रोवले होते…पत्नीला आश्वासन दिलं होतं की यंदा जर चांगलं उत्पन्न आलं तर तुला 2000 रूपयांची साडी घेऊन देईल…मुलांना आश्वासन दिलं होतं की यंदा उत्पन्न चांगले झाले तर नवीन कपडे, नवीन चप्पल, सायकल घेऊन देईल…पण यंदा शेतकऱ्याचा पदरात फक्त आणि फक्त निराशा आली आहे…शेतकरी एक एक रूपयासाठी तरसत आहे…

हाच तो कृषी प्रधान देश आहे, ज्यामध्ये आयफोन खरेदी करायला रांगा पाहायला मिळतात…हाच तो देश आहे, जिथे दारूच्या दुकानाबाहेर आजही रांगा पाहायला मिळतील…पण याच देशात अन्नदाता शेतकऱ्याच्या पिकाला अडीच रूपये किलो, 4 रूपये किलो दर मिळत आहे….आपण जेव्हा दुकानात खरेदी करायला जातो, तेव्हा त्यांना जरा पैसे कमी करा, असे कधीच म्हणत नाही…कारण तिथं आपली किंमत कमी होईल असं वाटतं…पण शेतकऱ्याचे पिकं असले तर 4 रूपये किलो दर असले तरी आपण म्हणतो 2 रूपये किलोने द्या..म्हणजे हे किती दुटप्पीपणा पाहायला मिळतो..एकीकडे शेतकऱ्याला जर 2 पैसे मिळत असेल तर त्यावर लगेच आपण आक्षेप घेतो…आणि दुसरीकडे आपलं स्टॅंडर्ड वाढवण्यासाठी अनावश्यक गोष्ट महागड्या किंमतीत खऱेदी करताना काही जण दिसतात…

मराठवाड्यात दुष्काळाने शेतकरी संकटात का? ( Marathwada Drought )

निसर्गाची अवकृपा, कोरडे पडलेले पाझर तलाव, करपून गेलेली पिके आणि उन्हाच्या तीव्र झळा… हे आज मराठवाड्यातील ग्रामीण भागाचे विदारक चित्र आहे… मराठवाड्यात यंदा पावसाने दगा दिल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे… शेतात काहीच पिकले नसल्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचे पोट कसे भरायचे आणि घरासमोर बांधलेल्या मुक्या जनावरांना काय खायला घालायचे, या विवंचनेत आज शेतकरी रात्रं-दिवस काढत आहे…. कर्जबाजारीपणा आणि डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होणारा संसार न पाहवल्यामुळे अनेक भागांत हतबल शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे…तर हजारो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत…

या भयानक संकटातही ज्या काही शेतकऱ्यांनी छातीचा कोट करून, पदरचे पैसे मोडून, टँकरने किंवा विहिरीच्या शेवटच्या थेंबावर आपली पिके कशीबशी जगवली, त्यांच्या नशिबी पुन्हा एकदा क्रूर थट्टा पाहायला मिळत आहे… बाजारात पिकाला मिळणारा भाव हा कवडीमोल ठरत असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडा मजुरीचा खर्चही निघणं अवघड आहे…शेतकरी कुटुंबाचे आणि आपल्या मुक्या जनावरांचे कष्ट तर व्यर्थच आहे… परभणीतील एका शेतकऱ्याच्या मिरचीला बाजारात अवघा अडीच रुपये प्रति किलोचा दर मिळाला, तर टोमॅटोला अवघा चार रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे… वाहतुकीचा खर्च, बारदानाचा खर्च आणि हमाली, तोलाई वजा केली, तर शेतकऱ्याच्या हातात एक रुपयाही शिल्लक राहत नाही… ही परिस्थिती पाहता “शेतकऱ्यांनी जगावं कसं आणि आपल्या हक्काच्या घामाचे पैसे मागायचे कुणाकडे?” असा सवाल आता निर्माण झालाय…

हेही वाचा : कॅप्टन स्मित मच्छार कोण आहेत? 174 प्रवाशांचे प्राण कसे वाचवले? विमानातील थरारक

शेतीमालाच्या दराचा प्रश्न इतका गंभीर का? ( Tomato Price )

या संपूर्ण चक्रात भारतीय बाजारपेठ आणि सामाजिक मानसिकतेतील एक अत्यंत वेदनादायी विरोधाभास समोर आला आहे… शरीराला आणि आरोग्याला घातक असणारी, ज्याची मानवी जीवनाला कोणतीही गरज नाही, ती गुटख्याची एक छोटी पुडी आज बाजारात 10 रुपयांना सहज विकली जाते… आरोग्याचा नाश करणारी दारूची बाटली 200 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत लोक आनंदाने विकत घेतात…तिथे कोणीही भाव करत नाही, मंदीचे कारण सांगत नाही… मात्र ज्या अन्नावर अख्खा देश जिवंत राहतो, जे अन्न खाऊन डॉक्टर, इंजिनिअर, नेते आणि अधिकारी घडतात, जनता जिवंत राहते… त्याच अन्नाची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला अडीच आणि चार रुपये दर मिळतो, हा या व्यवस्थेचा सर्वात मोठा पराभव आहे…

दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे… चारा छावण्यांची मागणी होत असली तरी जमिनीवर अजूनही जनावरांना कोरडा पेंढा मिळणे कठीण झाले आहे… स्वतः उपाशी राहून ज्या जनावरांना लेकराप्रमाणे पाळले, त्यांना डोळ्यादेखत भुकेने व्याकुळ होताना पाहणे शेतकऱ्यासाठी मरणयातना देणारे ठरत आहे…

Marathwada Farmer Crisis : शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले हे दुःखाचे आणि उपेक्षेचे फेरे कधी संपणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे… जोपर्यंत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही, जोपर्यंत हमीभावाची कायदेशीर अंमलबजावणी होत नाही आणि जोपर्यंत निसर्गाच्या लहरीपणापासून पिकांना वाचवणारी कायमस्वरूपी जलसंधारणाची व सिंचनाची व्यवस्था मराठवाड्यात उभी राहत नाही, तोपर्यंत अन्नदात्याचे हे मरण सत्र थांबणार नाही… आज गरज आहे ती केवळ कागदी पॅकेजची घोषणा करण्याची नव्हे, तर शेतकऱ्याला बाजारात आणि शेतात सन्मानाने जगू देणाऱ्या ठोस धोरणांची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts