Mumbai Marathi Manus : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे…मुंबई 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मराठी माणसाची हक्काची भूमी आहे… मात्र, गेल्या काही वर्षांत मुंबई आणि आसपासच्या उपनगरांचे भौगोलिक आणि सामाजिक चित्र झपाट्याने बदलले आहे…ज्या मुंबईसाठी बलिदान देण्यात आले, त्याच मुंबईत आज मराठी माणूस पोरका झाला आहे…मराठी माणसाला घरं दिले जात नाही…परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळते..आता मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी “मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान आहे” असा उल्लेख केला…त्यामुळे मुंबई नेमकी कुणाची आहे, असा प्रश्न निर्माण झालाय…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती केली…पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय पुढे ढकलत, मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदत दिली आहे, असा आरोप आहे…मुंबईत हा प्रकार सुरू असताना महायुती सरकार शांत पाहायला मिळत आहे….मतांच्या राजकारणासाठी सर्व नेते शांत आहेत का? मुंबईतून मराठी माणसाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे का? राज्य सरकार कारवाई का करत नाही?
मुंबईच्या बदलत्या सामाजिक चित्राची चर्चा का सुरू झाली?
मिरा-भाईंदर, कांदिवली, बोरिवली आणि घाटकोपर यांसारख्या मुंबईच्या ( Mumbai ) उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे…या ठिकाणी मराठी माणूस फक्त नोकरीच्या शोधात भटकत राहिला…तर प्ररप्रांतीय या ठिकाणी येऊन कचोरीसह इतर खाद्यपदार्थांची दुकानं, पाणीपुरी असे व्यवसाय सुरू केले…काही वर्षानंतर या प्ररप्रांतीयांनी व्यवसायाच्या जोरावर घर, दुकानं, जमिनी विकत घेतल्या…याच ठिकाणी मराठी माणूस व्यवसायाला कमी लेखत नोकरीच्या शोधात राहिला…आज परिस्थिती अशी आहे की याच मुंबईत आणि परिसरात मराठी माणसाला घर देखील मिळत नाहीये…
आज राजकीय आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर तिथल्या सार्वजनिक जीवनावर स्वतःचे सांस्कृतिक आणि धार्मिक नियम लादण्याचे प्रयत्न सत्ताधारी आमदारांकडून उघडपणे केले जात आहेत… ठाण्यात एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट विधान केले की, ते अशा नगरीतून येतात ज्याला मिनी राजस्थान आणि जैनांची नगरी म्हटले जाते… मिरा-भाईंदरमध्ये 33 पेक्षा जास्त जैनालय आहेत… आज आमदार जैन, महापौर जैन आणि नऊ नगरसेवकही जैन आहेत… मिरा-भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा जैनांचा विषय येतो, तेव्हा ते ताकदीने उभे राहतात…
हेही वाचा : मरणापासून अवघे ५-१० सेकंद दूर… स्मित मच्छारांचा जीव वाचला, डॉक्टरांनी सांगितला थरारक अनुभव
नरेंद्र मेहतांच्या वक्तव्यानंतर नेमका वाद काय झाला? ( Narendra Mehta Mira Bhayandar )
आमदार नरेंद्र मेहता यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे… मुळात ज्या कोकणपट्टीच्या आणि मुंबईच्या किनाऱ्यावर कोळी, आगरी आणि भंडारी हे मराठी बांधव पिढ्यानपिढ्या राहत आहेत, तिथे केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि मतपेढीच्या गणितांसाठी संपूर्ण शहराला एका विशिष्ट धर्माचे किंवा प्रांताचे घोषित करणे हा मराठी अस्मितेवर मोठा आघात मानला जात आहे…यापूर्वी मुंबईत कबुतरांचा वाद चांगलाच पेटला होता…मुंबईकरांना कबुतरांंच्या विष्ठेपासून गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असताना जैन धर्मियांनी आंदोलन करत कुबतरखाना बंद करण्याला विरोध केला…
आमदार नरेंद्र मेहता यांच्या याच सत्तेच्या प्रभावामुळे मिरा-भाईंदर भागात अनेक नवीन वाद समोर आले आहेत. त्यांच्याच मालकीच्या ‘तपोवन विद्यालयात’ बहुतांश विद्यार्थी जैन समाजाचे असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना डब्यात मांसाहार आणि कंदमूळ म्हणजेच कांदा-लसूण न आणण्याचे कडक फतवे जारी करण्यात आले होते…याशिवाय, मिरा-भाईंदर परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि मुख्य सार्वजनिक रस्त्यांवर जैन साधूंसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून स्थानिक मराठी आणि इतर नागरिकांमध्ये आधीच तीव्र असंतोष आहे… जैन मुनी अनवाणी चालतात, म्हणून रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या, ज्याला स्थानिक मराठी संघटनांनी सार्वजनिक रस्त्यांचे खाजगीकरण आणि धार्मिक सक्ती मानून कडाडून विरोध केला होता…पण या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की, हे आमदार दक्षिण भारतात जाऊन, तामिळनाडूत जाऊन असं विधान करू शकतात का? आमदार मेहतांनी एकदा तामिळनाडूत जाऊन असं विधान करून दाखवावं…
मुंबईत घर मिळण्याच्या प्रश्नाचा मराठी माणसाशी काय संबंध? ( Mumbai Marathi People )
मूळ मुंबईतही सध्या सर्वाधिक अस्वस्थ करणारा प्रकार म्हणजे मराठी माणूस मांसाहार करतो…त्यामुळे मराठी माणसाला सोसायट्यांमध्ये घरे, व्यावसायिक जागा नाकारली जाते… मुलुंडमधील एका इमारतीत तृप्ती देवळेकर या मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती…तर अमराठी माणसांना इथं जागा दिली जात नाही, हा आमचा नियम आहे, असे उघडपणे सांगितले होते… हा केवळ एका जागेचा वाद नाही, तर मुंबईतील विलेपार्ले, घाटकोपर, मलबार हिल आणि गिरगाव यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या हाय-राईज लक्झरी टॉवर्समध्ये मराठी कुटुंबांना भाड्याने, खरेदीसाठी घरे न देण्याचा एक पॅटर्न बिल्डर्स आणि एजंट्सनी तयार केला आहे… आम्हाला फक्त प्युअर व्हेजिटेरियन म्हणजेच शुद्ध शाकाहारी लोक हवेत असे बोर्ड उघडपणे लावून मराठी माणसाची कोंडी केली जाते… काही ठिकाणी जर मराठी कुटुंबाने घर खरेदी केलेच, तर त्यांना घरात मासे, मटण शिजवण्यास शेजाऱ्यांकडून विरोध केला जातो… लिफ्टमधून मांसाहारी अन्न नेण्यावर बंदी घातली जाते… हा केवळ खाण्यापिण्याचा वाद नसून शाकाहाराच्या नावाखाली विशिष्ट वर्गाची मक्तेदारी निर्माण करून मराठी माणसाला विशिष्ट भागांमधून हद्दपार करण्याचा हा आर्थिक वर्णद्वेष आहे…
मुंबईतून मराठी माणूस कमी का होत चालला आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल…तर याचे सर्वात मोठे आणि कटू सत्य पैसा आहे… मुंबईतील परळ, लालबाग, चिंचपोकळी हा गिरणगावाचा भाग कधीकाळी मराठी कामगारांचे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे हृदय मानला जायचा… मात्र, गिरण्या बंद पडल्यानंतर त्या जमिनींवर टोलेजंग मॉल्स आणि कोट्यवधी रुपयांचे लक्झरी टॉवर्स उभे राहिले… मुंबईत आज घरांच्या किमती चौरस फुटाच्या हिशोबाने गगनाला भिडल्या आहेत…मराठी माणूस घर, जमिनी खरेदी करण्याऐवजी जमिनी विकत गेला आणि दुसरीकडे जाऊन राहायला लागला…तसंच नोकरीचा शोध घेत राहिला, व्यवसायाकडे लक्षच दिलं नाही…त्यामुळे नोकरदार मराठी माणसाला मुंबईच्या मुख्य भागात घर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अवघड झाले आहे… परिणामी, मराठी माणूस मुंबई सोडून कल्याण, डोंबिवली, बदलापूर, विरार आणि पनवेल या मुंबईबाहेरील दूरच्या उपनगरांमध्ये जाऊन राहू लागला… जागा खरेदी करण्याची आर्थिक क्षमता परप्रांतीय कॉर्पोरेट वर्ग, व्यापारी आणि उद्योगपतीकडे जास्त असल्याने मुंबईच्या रिअल इस्टेटवर आणि भौगोलिक रचनेवर आज अमराठी लोकांचे पूर्ण नियंत्रण आले आहे.. ज्यामुळे मराठी माणूस स्वतःच्याच राजधानीत अल्पसंख्याक होत चालला आहे…
मुंबईच्या मराठी अस्मितेचा प्रश्न पुढे कुठे जाणार? ( Mumbai Marathi Manus )
काही प्रकरणांमध्ये परप्रांतीय रहिवासी मराठी माणसांना तुम्ही आमच्या भागात राहता, त्यामुळे आमच्या नियमांनुसार राहावे लागेल, अशा धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे… रिक्षा-टॅक्सी व्यवसाय, फेरीवाले आणि बांधकाम क्षेत्रावर परप्रांतीयांचे वर्चस्व निर्माण झाले असून, ते मुंबईच्या स्थानिक राजकारणात एक मोठा दबाव गट तयार करत आहेत… मराठी माणसावर स्वतःच्याच भूमीत एवढा अन्याय होत असताना आणि त्यांना धमक्या दिल्या जात असताना सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत… याचे मुख्य कारण मुंबईच्या बदललेल्या मतपेढीमध्ये आहे… मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे… कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, सायन कोळीवाडा या भागांमध्ये अमराठी मतदारांना नाराज करून कोणतीही निवडणूक जिंकणे कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही…यामुळेच तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी बदलला आहे..थेट एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे…2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे…ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे…सध्या मुंबईत सुरू असलेल्या घडामोंडीवरून तुम्हाला काय वाटतं खरंच मुंबई मराठी माणसांची राहिलीये का?









