Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • साताऱ्यात कौटुंबिक वादाचा धक्कादायक अंत! शिक्षक पित्याने १७ वर्षीय मुलीवर केला जीवघेणा हल्ला
गुन्हा

साताऱ्यात कौटुंबिक वादाचा धक्कादायक अंत! शिक्षक पित्याने १७ वर्षीय मुलीवर केला जीवघेणा हल्ला

Satara Murder Case
33
Satara Murder Case: साताऱ्यातील गोडोली परिसरात कौटुंबिक वादातून १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी लाकडी बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोबाईलचा वापर आणि टीव्ही पाहण्यावरून घरात झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. साताऱ्यातील गोडोली परिसरातील स्वराज्यानगर येथे एका शिक्षक पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार केल्याचा आरोप असून, या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी वडिलांना अटक (Satara Murder Case) केली आहे. मृत मुलीचे नाव आर्या पुरुषोत्तम कदम (१७) असे आहे. तर आरोपीचे नाव पुरुषोत्तम संपत कदम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलीच्या वर्तनावरून घरात आधीपासून तणाव

कदम कुटूंबीय मूळचे चंचळी ( कोरेगाव) येथील असून, पुरुषोत्तम कदम आणि त्यांची पत्नी शीला हे दोघेही शिक्षक (Satara Crime News) असल्याचे सांगण्यात येते. मुलीच्या वर्तनावरून कुटूंबात यापूर्वीही मतभेद हो होते. परिस्थिती सुधारावी यासाठी तिचे समुपदेशन तसेच वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: “प्रिय कोकण, तू पुन्हा माझं मन जिंकलंस!”; स्वप्नील जोशीची वेंगुर्ल्यात खास फॅमिली ट्रिप, शेअर केला Video

काही महिन्यांपूर्वीही मुलीने वडिलांशी (Father Kills Daughter) वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण असल्याचे तपासात समोर आले आहे.

टीव्ही आणि मोबाईलवरून वाद वाढला

शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून आणि मोबाईलच्या वापरावरून घरात पुन्हा वाद झाला. या दरम्यान मुलीचा लहान बहिणीसोबतही वाद झाल्याचे सांगितले जाते.

वाद वाढल्यानंतर मुलीने हातात बॅट घेत वडिलांकडे धाव घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावेळी पुरुषोत्तम कदम यांनी तिच्याकडील बॅट घेत तिच्या डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेली मुलगी खाली कोसळली.

घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यास विलंब

घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती न देता मुलगी बेशुद्ध असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घटनास्थळी असलेले रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आला.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली.

चौकशीनंतर वडिलांना अटक

पोलिसांनी कुटुंबीयांची स्वतंत्रपणे चौकशी केली. चौकशीदरम्यान घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आणि त्यानंतर पुरुषोत्तम कदम यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी मुलीवर बॅटने प्रहार केल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती, कुटुंबातील पूर्वीचे वाद आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित प्रयत्नांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts