Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • रॅपिडो चालक निघाला दहशतवादी! मुंबईत दहशतवादी कटाचा संशय?
Mumbai

रॅपिडो चालक निघाला दहशतवादी! मुंबईत दहशतवादी कटाचा संशय?

Mumbai ATS rapido News
29

Mumbai ATS rapido News : मुंबईच्या गजबजलेल्या माहिम मेट्रो स्टेशनजवळ तो रोजच दिसायचा. हातात रॅपिडो कंपनीचं हेलमेट, अंगावर एक साधा टी-शर्ट आणि चेहऱ्यावर अगदी सामान्य मुंबईकरासारखा भाव. दिवसा मुंबईच्या ट्रॅफिकमधून रॅपिडो बाईक चालवायची, रात्री माहिमच्या गल्लीबोळात अत्तर विकायचा. नाव मोहम्मद हसन (Mohammad Hasan Mumbai Case) अबू सरमद अख्तर…. वय वर्षे ३३. पण या साध्या चेहऱ्यामागे देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणारा एक भयानक खेळ सुरू आहे, याची भल्याभल्यांना कल्पनाही नव्हती.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने जेव्हा या मोहम्मद हसनच्या मुसक्या आवळल्या, तेव्हा जी माहिती समोर आली ती हादरून टाकणारी होती…. कारण हा फक्त एक साधा बाईक रायडर नव्हता, तर थेट पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मुंबईतील स्लीपर एजंट असल्याचा संशय आता बळावला आहे. काय आहे प्रकार मुंबईत काय घडवण्याचा प्लान होता ? ATS ने कसं घेतलं ताब्यात ?

मुंबईत दहशतवादी कटाचा संशय? (Mumbai ATS rapido News)

मुंबईसारख्या महानगरांमध्ये दररोज लाखो तरुण पोटापाण्याची साधनं शोधत असतात. कुणी डिलिव्हरी बॉय बनतं, तर कुणी बाईक टॅक्सी चालवतं. याच गर्दीचा फायदा घेत दहशतवादी संघटनांनी आता आपला पॅटर्न बदलला आहे. मोहम्मद हसननेही मुंबईत स्वतःची ओळख लपवण्यासाठी हाच मार्ग निवडला. तो दिवसभर मुंबईच्या रस्त्यांवरून प्रवाशांची ने-आण करायचा. यामुळे कुणालाही त्याच्यावर संशय येण्याचं कारण नव्हतं. उलट, रॅपिडो रायडर असल्यामुळे त्याला मुंबईच्या कानाकोपऱ्याची, महत्त्वाच्या वास्तूंची आणि व्हीआयपी हालचालींची माहिती सहज मिळत होती, असं आता एटीएसच्या तपासात समोर येत आहे.

या संपूर्ण कारवाईची सुरुवात झाली ती एका गुप्त माहितीवरून. एटीएसच्या काळाचौकी युनिटला एका अत्यंत विश्वासू सूत्राकडून माहिती मिळाली होती की, माहिम परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असून तोपाकिस्तानमधील काही कट्टरपंथीयांच्या संपर्कात आहे. एटीएसने तात्काळ सापळा रचला आणि माहिम मेट्रो स्टेशनजवळून मोहम्मद हसनला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो स्वतःला निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मी तर फक्त गरिबीमुळे अत्तर विकतो आणि बाईक चालवतो, असं तो सांगत होता. पण एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याचा मोबाईल फोन हस्तगत केला आणि त्याचा पासवर्ड उघडला, तेव्हा समोर आलेला डेटा पाहून अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले. त्याच्या मोबाईलमध्ये जे काही सापडलं, ते थक्क करणारं होतं. भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed Investigation) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरची प्रक्षोभक आणि चिथावणीखोर ऑडिओ भाषणं त्याच्या फोनमध्ये डाऊनलोड केलेली होती. इतकंच नाही तर जिहादचं उघडपणे समर्थन करणारे संदेश, देशविरोधी सोशल मीडिया पोस्ट आणि भारताच्या अखंडतेला आव्हान देणारे शेकडो स्क्रीनशॉट्स त्याच्या फोनमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. हा माणूस डिजिटल जगाचा वापर करून मुंबईत बसून तरुणांची माथी भडकवण्याचं काम करत होता, याचे स्पष्ट पुरावे एटीएसच्या हाती लागले.

हेही वाचा : Himanshu Bhau : लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर शत्रू अमेरिकेत पकडला? कोण आहे हा हिमांशू भाऊ?

जैश-ए-मोहम्मदशी संपर्क असल्याचा संशय (Mumbai Terror Suspect)

या तपासात सर्वात मोठा खुलासा झाला तो म्हणजे सोशल मीडिया आणि टेलिग्राम ॲपचा वापर. मोहम्मद हसन हा ‘इब्न-ए-कासिम’ नावाच्या एका मोठ्या टेलिग्राम चॅनेलचा सक्रिय सदस्य होता. हे चॅनेल थेट पाकिस्तानमधून नियंत्रित केलं जातं. या चॅनेलचा मुख्य उद्देश भारतामध्ये धार्मिक सलोखा बिघडवणं आणि मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवणं हा आहे. हसन फक्त या चॅनेलचा सदस्य नव्हता, तर तो स्वतः अशाच पद्धतीचे काही गुप्त टेलिग्राम ग्रुप्स मुंबईत चालवत होता. या ग्रुप्सवर तो बाबरी मशीद किंवा इतर संवेदनशील धार्मिक मुद्द्यांवरून मसूद अजहरच्या ऑडिओ क्लिप्स शेअर करायचा, जेणेकरून तरुणांमध्ये देशाविरुद्ध चीड निर्माण होईल. पण या सगळ्या कडीमध्ये सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक बाब पुढे आली ती म्हणजे भारताच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये काही त्रुटी राहिल्याची एक बातमी सोशल मीडियावर आली होती. हसनने या बातमीवर अत्यंत आक्षेपार्ह आणि संशयास्पद टिप्पणी केली होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेसारख्या अतिसंवेदनशील विषयावर अशा प्रकारची टिप्पणी करणं हा काही साधा योगायोग असू शकत नाही, असा एटीएसला संशय आहे. तो मुंबईत राहून देशातील सर्वोच्च नेत्यांच्या सुरक्षेची माहिती गोळा करत होता का, किंवा व्हीआयपी दौऱ्यांवर पाळत ठेवत होता का, या अँगलने आता एटीएस त्याचे कॉल डिटेल्स आणि चॅट्स खंगाळत आहे.

संशयिताच्या मोबाईलमधील माहिती काय दर्शवते? (Rapido Driver News)

एटीएसच्या प्राथमिक तपासात या हसनचे धागेदोरे पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटर्सशी म्हणजेच पीआयओशी जोडलेले असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना नेहमीच भारतामध्ये अशा स्लीपर सेल्सचा वापर करून देशांतर्गत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. हसनला पाकिस्तानमधून कोण ऑर्डर्स देत होतं, त्याला इंटरनेटचा खर्च किंवा इतर आर्थिक रसद कुठून पुरवली जात होती, याची साखळी आता अधिकारी शोधत आहेत. कारण सीमापार बसलेले त्याचे हँडलर्स त्याला मुंबईत एखादा मोठा घातपात घडवून आणण्यासाठी तयार करत होते की काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्या मुंबई एटीएसने मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हसन सध्या एटीएसच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, दहशतवादाचा चेहरा आता बदलला आहे. आता दहशतवादी हत्यारं घेऊन येत नाहीत, तर ते तुमच्या-आमच्यासारखे सामान्य कपडे घालून, सामान्य नोकऱ्या करून समाजात मिसळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देशाविरुद्ध युद्ध पुकारतात. मोहम्मद हसनची अटक ही मुंबई एटीएससाठी खूप मोठं यश मानली जात आहे, कारण यामुळे मुंबईत घातपात घडवण्याचा किंवा समाजात दंगल घडवण्याचा एक मोठा कट वेळेत उधळला गेला आहे. पण अजूनही असे किती स्लीपर एजंट मुंबईच्या गर्दीत लपून बसले आहेत, याचा शोध घेणं हे सुरक्षा यंत्रणांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts