निरंजन कामत । कोल्हापूर प्रतिनिधी / ९ नोव्हेंबर २०२६
Kolhapur Gokul Sangharsh Morcha: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीकडून संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चाला हजारो दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याची माहिती समोर आली आहे.
गोकुळ वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र या, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर आणि मराठवाड्यातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले.
सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा संघर्ष मोर्चा (Kolhapur Gokul Sangharsh Morcha)
गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि समविचारी आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही मोर्चात सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मोठ्या संख्येने आंदोलन यशस्वी करण्याचा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी (Gokul Milk Union)
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीच्या आघाडीला १२ जागा मिळाल्या होत्या.
मात्र, त्यानंतर राज्य सरकारने मोठी उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. यातील चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या तरतुदीवरून वाद निर्माण झाला आहे.
निवडून आलेल्या संचालकांचं बहुमत डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सतेज पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : PM Modi Bastar Diwali 2026: जवानांसोबत मोदींची दिवाळी! नक्षलवादाबाबत बस्तरमधून मोठं विधान
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सहभाग
गोकुळ दूध संघाचा प्रश्न केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्राबरोबरच सोलापूर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदवल्याची माहिती आहे. गोकुळ दूध संघाची स्वायत्तता टिकवावी आणि शासननियुक्त संचालकांबाबतचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, शासनाच्या निर्णयाला न्यायालयातही आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पुढे काय निर्णय होणार, याकडे सहकार क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
गोकुळच्या सत्तासंघर्षामुळे कोल्हापुरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून, या संपूर्ण संघर्ष मोर्चाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी.








