Murtijapur Diwali Celebration: स्मशानभूमीत दिव्यांची रोषणाई..!फटाक्यांची आतषबाजी नाही, तर पूर्वजांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत लावला दीप…पत्रकार, नगरसेवक आणि समाजसेवकांची अनोखी दिवाळी..!
र्तिजापुरात स्मशानभूमीत साजरी केली अनोखी दिवाळी (Diwali in Cemetery)
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण! दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, फराळ आणि आनंदाचा उत्सव…! मात्र, याच दिवाळीला मूर्तिजापूरमध्ये सामाजिक बांधिलकीचं भान बाळगत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यात फटाक्यांचा आवाज नव्हता… रोषणाईचा झगमगाट नव्हता. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ चक्क स्मशानभूमीत दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. पत्रकार, नगरसेवक आणि समाजसेवक या उपक्रमासाठी पुढं आले. पाहुया मूर्तिजापुरातली ही अनोखी दिवाळी.
यंदाची दिवाळी मूर्तिजापुरातील नागरिकांसाठी अनोखी ठरली. ज्या स्मशानभूमीत जाण्यास अनेक जण घाबरत असतात तिथं दिवाळी साजरी करण्याचा निर्णय यंदा घेण्यात आला. यासाठी स्मशानभूमीत पत्रकार, नगरसेवक आणि समाजसेवक एकत्र आले. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित केले. पूर्वजांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली. हे करीत असताना फटाक्यांची आतषबाजी आणि इतर दिखाऊ खर्चाला पूर्णपणे फाटा देण्यात आला.
पत्रकार, नगरसेवक आणि समाजसेवकांचा उपक्रमात सहभाग
या उपक्रमात मूर्तिजापूरचे उपनगराध्यक्ष रोहित अवलवार, नगरसेवक सचिन देशमुख, निलेश उर्फ गंपू शर्मा, राहुल पाटील, रवी माडकर, श्रीकांत जोशी, निलेश वानखडे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. दीपक जोशी, आदित्य महाजन, शाम वाळसकर, प्रतिक कुऱ्हेकर, प्रेमराज शर्मा, शक्ती यांच्यासह सहकाऱ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला.
स्मशानभूमी म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. नकारात्मक भाव निर्माण होतात. मात्र जन्माची सुरुवात रुग्णालयातून होत असते तर जीवनाचा शेवट स्मशानभूमीत होत असतो. त्यामुळं दोन्हीही ठिकाणं जीवनचक्राचाच अविभाज्य भाग असतात. त्यामुळं त्यातील कोणतंही ठिकाण अपवित्र किंवा अमंगल असू शकत नाही. या विचारातून यंदा दिवाळी स्मशानभूमीत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सणाच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जावं हाही या उपक्रमामागचा उद्देश होता.
दिवाळीच्या माध्यमातून समाजाला दिला सकारात्मक संदेश (Cemetery Diwali Celebration)
केवळ घरात दिवे लावल्यानं दिवाळी साजरी होत नाही तर या निमित्तानं समाजातील अंधश्रद्धा दूर करून चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. असा संदेश या प्रेरणादायी उपक्रमातून देण्यात आलाय.
दिवाळीच्या दिव्यांनी केवळ घरच उजळू नये, तर समाजातील अंधश्रद्धेचा अंधारही दूर व्हावा… मूर्तिजापूरमधील या अनोख्या दिवाळीने हाच सकारात्मक संदेश दिलाय.








