Dharashiv Crime : आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; कुंथलगिरीच्या डोंगरदरीत २७ वर्षीय गोविंद कागदे यांचा मृतदेह आढळला, गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आणि डोक्यात दगड घातल्याचा आरोप,धाराशिवमध्ये प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुंथलगिरीच्या डोंगरदरीत आढळला मृतदेह
गोविंद शिवाजी कागदे (वय २७, रा. गोलेगाव, ता. वाशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान वाशी तालुक्यातील रामकुंड शिवारात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. सरमकुंडी ते भूम मार्गालगत असलेल्या कुंथलगिरीच्या डोंगरदरीत गोविंद यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. तसेच डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. (Dharashiv Murder Case)
या प्रकरणातील माहितीनुसार, गोविंद आणि अंजली यांचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, अंजलीचा या विवाहाला विरोध असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहानंतर अंजलीचे शुभम सुभाष खोसे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. या संबंधांमध्ये गोविंद अडथळा ठरत असल्याने त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
हेही वाचा : पत्नीची हत्या करून सासरच्या कुटुंबालाही संपवलं? कॅब ड्रायव्हरच्या भयंकर कटाने बेंगळुरू हादरलं!
पत्नी आणि कथित प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा
गोविंद यांचे चुलत बंधू ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अंजली गोविंद कागदे आणि शुभम सुभाष खोसे यांच्याविरोधात संगनमताने खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Crime News)
पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हत्या नेमकी कशा प्रकारे करण्यात आली, त्यामागील कारण काय होते आणि कथित कटाची आखणी कशी करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासातून या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.









