FDA Action : पुणे-नाशिकमध्ये FDA Action अंतर्गत २५ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. १२ हॉटेल्सचे परवाने निलंबित; Food Safety आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर. (uncleanliness hotel kitchens)
राज्यातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि नाशिकमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पुण्यातील २० हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये चार हॉटेल्स आणि एका कॅफेसह पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यात २० हॉटेल्सची तपासणी; आठ परवाने निलंबित (Licenses suspended)
पुण्यातील कॅम्प, एम. जी. रोड, पुणे रेल्वे स्टेशन परिसर, हडपसर आणि कोंढवा भागातील हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि कृत्रिम रंगांचा वापर यांसारख्या बाबी निदर्शनास आल्या. त्यानंतर आठ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो रेस्टॉरंट आणि शिवाय कॉर्नर, ईस्ट स्ट्रीटवरील सहाना व्हेज रेस्टॉरंट, कॅम्पमधील ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी, बाबासाहेब चौकातील राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, एम. जी. रोडवरील द बर्गर बार्न कॅफे, हडपसरमधील महादेव फूड्स आणि कोंढवा खुर्दमधील फिरोज केटरर्स यांचा समावेश आहे.
हेही वाचा : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलवर FDA चा दणका! परवाने निलंबित; नेमकं काय आढळलं?
नाशिकमध्ये प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सवरही कारवाई (Actions on Hotels)
दुसरीकडे, नाशिक शहरातही अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी मोहीम राबवली. १९ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध हॉटेल्स आणि कॅफेंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ चे उल्लंघन आणि स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळल्या. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी चार हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने आणि एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. या कारवाईत जुना गंगापूर नाका परिसरातील हॉटेल विहार, सातपूरमधील श्यामसुंदर मिसळ, कॉलेज रोडवरील तुषार मिसळ, आडगाव फाटा येथील महाराजा काठियावाड आणि कृषीनगरमधील दुर्गा कॅफे यांचा समावेश आहे.
कुठे काय आढळले?
नाशिकमधील तपासणीदरम्यान काही हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. काही ठिकाणी कच्च्या अन्नपदार्थांची अयोग्य पद्धतीने साठवणूक करण्यात आली होती. हॉटेल महाराजा काठियावाडच्या स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याचेही समोर आले. तसेच काही ठिकाणी ग्राहकांच्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नसणे आणि मेन्यू कार्डवर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमाची माहिती नसणे अशा त्रुटी आढळल्या.
हॉटेल व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे, कच्च्या आणि शिजवलेल्या अन्नाची योग्य साठवणूक करणे, मुदतबाह्य पदार्थांचा वापर टाळणे आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून यापुढेही तपासणी आणि कारवाई केली जाऊ शकते. पुणे आणि नाशिकमधील या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.









