West Vidarbha Rain: यंदाच्या मॉन्सूनच्या लहरीपणाचा मोठा फटका पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.
पावसाचे उशिरा आगमन, सुरुवातीच्या काळातील अनिश्चितता, काही भागांत झालेली अतिवृष्टी, दुबार-तिबार पेरणी आणि आता पीकवाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पडलेला दीर्घ कोरडा खंड यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील तब्बल ४० लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर यासह अन्य खरीप पिकांना पावसाअभावी फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: आज शेवटचा श्रावणी सोमवार; अजा एकादशीचा योग, शिवामूठ आणि पूजेची वेळ जाणून घ्या
ऑगस्टमध्ये पावसाची ५८ टक्के तूट
ऑगस्ट महिन्यात विदर्भात सरासरी २९७.१ मिलिमीटर पावसाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात केवळ १२५.५ मिलिमीटर पाऊस झाल्याने ऑगस्टमध्ये तब्बल ५८ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पावसातील या मोठ्या तुटीचा परिणाम ऐन पीकवाढीच्या काळात झाला आहे. आधीच पेरणीच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. आता उगवलेली पिकेही पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्येही गंभीर स्थिती
अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट असल्याचे आकडे सांगतात.
अकोला – ८४ टक्के तूट
अमरावती – ८२ टक्के तूट
यवतमाळ – ७८ टक्के तूट
वर्धा – ७३ टक्के तूट
वाशीम – ७१ टक्के तूट
बुलडाणा – ६१ टक्के तूट
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर खरीप हंगाम वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
अतिवृष्टीपासून आता कोरड्या खंडापर्यंत संकट
यंदाच्या हंगामात पश्चिम विदर्भातील(West Vidarbha) शेतकऱ्यांना पावसाच्या दोन्ही टोकांचा सामना करावा लागत आहे. काही भागांत सुरुवातीला अतिवृष्टी झाली, तर काही भागांत पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची वाढ, जमिनीतील ओलावा आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलामुळे अचानक मुसळधार पाऊस, दीर्घकाळ पाऊस न पडणे आणि वाढते तापमान यांसारख्या समस्या वाढत असल्याचे शेतकरी आणि तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. परिणामी पारंपरिक पावसाच्या अंदाजावर आधारित शेती करणे अधिक जोखमीचे ठरत आहे.
तालुकानिहाय वैज्ञानिक मूल्यांकनाची मागणी
पश्चिम विदर्भातील सद्यस्थितीचे तालुकानिहाय वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या भागात परिस्थिती गंभीर आहे, त्या भागात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी (Maharashtra Farmers) आणि विविध संघटनांकडून होत आहे. तसेच ४० लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे तातडीने पंचनामे आणि सर्वेक्षण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी
पिकांचे नुकसान लक्षात घेता पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना कर्जवसुलीपासून संरक्षण द्यावे आणि पीकविमा दावे (West Vidarbha Agriculture) तातडीने निकाली काढावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. आता प्रशासनाकडून पिकांचे सर्वेक्षण कधी सुरू होते आणि शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना जाहीर केल्या जातात, याकडे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.









