RBI FCNRB Deposit Deadline: NRIंकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे RBIने FCNR(B) ठेवींसाठीची विशेष परकीय चलन स्वॅप सुविधा मुदतीआधीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेअंतर्गत नवीन ठेवी स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे.
अनिवासी भारतीयांकडून (NRI) परकीय चलनातील ठेवींना मिळालेला जोरदार प्रतिसाद पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या विशेष FCNR(B) स्वॅप सुविधेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाल्यानंतर नवीन FCNR(B) ठेवी स्वीकारण्याची सुविधा ३१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद केली जाणार आहे. (RBI FCNRB Deposit Deadline)
RBI च्या माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ५२.३ अब्ज डॉलरची परकीय चलनातील गुंतवणूक आकर्षित झाली आहे. त्यामुळे नियोजित मुदतीपूर्वीच या सुविधेचा ठेवी स्वीकारण्याचा टप्पा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
११ सप्टेंबरपर्यंत स्वॅपची सुविधा
३१ ऑगस्टनंतर (31 August 2026) नवीन ठेवी उभारता येणार नसल्या तरी आधीच या योजनेअंतर्गत जमा झालेल्या FCNR(B) ठेवींशी संबंधित स्वॅप व्यवहारांसाठी बँकांना 11 सप्टेंबर 2026 पर्यंत RBIकडे व्यवहार करता येणार आहेत.
दरम्यान, परदेशातून निधी उभारण्यासाठीच्या ECB आणि OFCB योजनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंत उपलब्ध राहणार आहेत.
जूनमध्ये सुरू झाली होती योजना (RBI FCNRB Deposit Deadline)
परकीय चलनाचा ओघ वाढवण्याच्या उद्देशाने RBI ने ८ जून रोजी विशेष डॉलर- रुपया स्वॅप व्यवस्था आणली होती. या माध्यमातून बँकांना तीन ते पाच वर्षांच्या कालावधीच्या नवीन FCNR(B) ठेवी मिळवून त्या RBIसोबत ठरावीक सवलतीच्या अटींवर स्वॅप करता येत होत्या.
या व्यवस्थेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे परकीय चलनातील ठेवींच्या हेजिंगचा खर्च बँकांसाठी कमी झाला. परिणामी, NRI गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक व्याजदर देणे बँकांना शक्य झाले. ( LS Marathi News Channel )
एकूण 56.846 अब्ज डॉलरचा निधी
13 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, या विशेष परकीय चलन सुविधेच्या तीन भागांमधून मिळून 56.846 अब्ज डॉलरचा निधी देशात आला. त्यापैकी FCNR(B) ठेवींचा वाटा सर्वाधिक राहिला.
FCNR(B)मधून 52.3 अब्ज डॉलर, OFCBमधून 2.805 अब्ज डॉलर आणि ECBच्या माध्यमातून 1.741 अब्ज डॉलरचा निधी आकर्षित झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
NRIंसाठी FCNR(B) ठेवींचे आकर्षण
NRI आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना FCNR(B) खात्यांमध्ये परकीय चलनात ठेवी ठेवण्याची सुविधा आहे. या ठेवी भारताबाहेर परत पाठवता येतात आणि भारतात त्यावर कर आकारला जात नाही.
विशेष स्वॅप सुविधेमुळे बँकांना परकीय चलन उभारण्याचा खर्च कमी झाल्याने त्यांनी NRI ग्राहकांना तुलनेने चांगले व्याजदर देण्यास सुरुवात केली. काही बँकांनी या कालावधीत FCNR(B) ठेवींवर सुमारे 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देऊ केले होते.
रुपयाला स्थैर्य देण्याचाही प्रयत्न
परकीय भांडवलाचा ओघ वाढवणे, देशातील डॉलरची उपलब्धता सुधारणे आणि रुपयाच्या स्थैर्याला आधार देणे, या व्यापक उद्देशाने RBIने ही योजना सुरू केली होती. मात्र, या सुविधेमुळे रुपयाच्या मूल्यात मोठी वाढ होईलच असे नाही.
FCNR(B) योजनेला मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा मोठा ठरल्याने RBIने नवीन ठेवींसाठीची विंडो आधीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपूर्वी या विशेष सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या NRI गुंतवणूकदारांसाठी आता मर्यादित कालावधी शिल्लक आहे.

