PM Modi Saptadhara: लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘सप्तधारा’चा रोडमॅप मांडला.
२०२६ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांगीण विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी भारताने सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रीय करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी या सात प्रवाहांना ‘सप्तधारा’ असे संबोधले.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यापूर्वी त्यांनी तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी लाल, पिवळा, हिरवा आणि पांढरा बांधणी पॅटर्न असलेली पगडी परिधान केली होती.
हेही वाचा: Live सामन्यात प्रेयसीला मेसेज करणं पडलं महागात; क्रिकेटपटूवर बोर्डाची मोठी कारवाई
या ७ क्षेत्रांवर राहणार फोकस
मोदींनी सांगितलेल्या ‘सप्तधारा’ मध्ये उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता, शेती व अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती व कनेक्टिव्हिटी, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, हरित व निळ्या अर्थव्यवस्थेला चालना आणि योग, आरोग्यसेवा, पर्यटन व सर्जनशील कलांच्या माध्यमातून भारताची जागतिक सॉफ्ट पॉवर मजबूत करणे यांचा समावेश आहे.
या सुधारणांमध्ये युवकांशी भूमिका महत्वाची असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या कौशल्यांचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशव्यापी टॅलेंट हंट सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
कोरोना महामारीनंतर जगाने युद्ध आणि संघर्षाचे आव्हान पहिले. या काळात भारताबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या, मात्र देशाने नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून संकटांचा सामना केला, असे मोदी म्हणाले. (PM Modi Independence Day Speech 2026)
२०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य निश्चितपणे साध्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील १४० कोटी नागरिकांनी या संकल्पासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत कोट्यवधी नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले असून, २५ कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले, असा दावाही त्यांनी केला.
‘व्होकल फॉर लोकल’ चा संदेश
आत्मनिर्भरतेवर भर देताना मोदींनी ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ चा संदेश दिला. भारताने आपल्या गरजांसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत उत्पादन आणि संसाधनांचा विकास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमका उद्देश काय?
देशातील तेलाच्या गरजेचा उल्लेख करताना समुद्रातील तेलसाठ्यांच्या शोधासाठी सरकारने पावले उचलल्याचे मोदी म्हणाले. ‘समुद्र मंथन’ उपक्रमासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी सकाळी राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले.
यंदाचा स्वातंत्र्यदिन ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षाशीही जोडलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना विद्यार्थ्यांना भारताच्या भविष्याचे शिल्पकार म्हटले होते. त्यांच्या संबोधनानंतर शनिवारी लाल किल्ल्यावर मुख्य स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला.





