Stock Market Highlights 13 April : पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, बीएसई सेन्सेक्स 702.68 अंकांनी घसरुन 76,847.57 अंकांवर बंद झाला (sensex plunges 703 points). एनएसई निफ्टी 50 निर्देशांक देखील 207.95 अंकांनी घसरुन 23,842.65 अंकांवर बंद झाला (nifty drops 208). बाजाराची सुरुवात जवळपास 2% च्या मोठ्या घसरणीनं झाली. मात्र, व्यापार पुन्हा सुरु झाल्यानंतर काही प्रमाणात सुधारणा दिसून आली.
हेही वाचा : होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नजर; इराणवरील सागरी नाकेबंदीमुळे तणाव वाढला
सेन्सेक्समधील केवळ 3 शेअर्स वाढीसह बंद :
सोमवारी सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 3 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर उर्वरित 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी 50 मध्ये, 50 पैकी केवळ 10 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर उर्वरित 39 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि एका कंपनीचा शेअर स्थिर राहिला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स आज 2.04 टक्क्यांच्या सर्वाधिक वाढीसह बंद झाले. मारुती सुझुकीचे शेअर्स 4.60 टक्क्यांच्या सर्वाधिक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील इतर शेअर्सपैकी, एनटीपीसीचे शेअर्स 1.54 टक्क्यांच्या वाढीसह आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स 0.17 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
कोणत्या शेअर्समुळं गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले :
दुसरीकडे, बजाज फायनान्सचे शेअर्स 2.80 टक्क्यांनी, इंडिगो 2.78 टक्क्यांनी, रिलायन्स इंडस्ट्रीज 2.64 टक्क्यांनी, टीसीएस 2.05 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 2.02 टक्क्यांनी, आयटीसी 1.82 टक्क्यांनी, इटरनल 1.69 टक्क्यांनी, एचसीएल टेक 1.45 टक्क्यांनी, टायटन 1.42 टक्क्यांनी, हिंदुस्थान युनिलिव्हर 1.30 टक्क्यांनी, महिंद्रा अँड महिंद्रा 1.28 टक्क्यांनी, इन्फोसिस 1.16 टक्क्यांनी, ट्रेंट 1.09 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 0.97 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स 0.78 टक्क्यांनी, अल्ट्राटेक सिमेंट 0.78 टक्क्यांनी घसरुन बंद झाले.












