The farmer sold his kidney to repay the loan : चंद्रपूर येथील एका सावकराने कर्जाच्या परताव्यापोटी शेतकर्याला किडनी विकायला लावून त्यामधून मिळणारे ८ लाख रुपये स्वतः घेतल्याचे समोर आले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली आणि लोकांनी संताप व्यक्त केला. खेडेगावात सावकार लोक शेतकऱ्यांच्या गरीबीचा फायदा उचलतात. त्यांना मोठ्या रक्कमेच्या व्याजावर कर्ज देतात. आणि कर्ज न फेडल्यास काहीही करायला भाग पाडता. असाच एक प्रकार घडल्याने सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याला कर्ज फेडता येत नसल्याने सावकाराने त्याची किडनी विकायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशात आणि राज्यात नेते विकसित भारत आणि समृद्ध भविष्याच्या घोषणा करत असताना, विदर्भातील चंद्रपूरसारख्या भागात शेतकरी आजही गरिबीच्या विळख्यात सापडले आहेत. याचे हे एक हृदयद्रावक उदाहरण आहे.
सावकारचा शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ
नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात राहणाऱ्या रोशन सदाशिव कुडे या तरुण शेतकऱ्याने सावकरावर गंभीर आरोप केलाय. काही वर्षांपूर्वी रोशनने दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने एक लाख रुपये उसने घेतले होते. पण दुर्दैवाने त्याची जनावरे मेली. यानंतर तो कर्ज परत करू शकला नाही. पुढे सावकार त्याच्यासोबत खेळ खेळू लागला.
कंबोडियात जाऊन आठ लाखांना विकली किडनी
सावकाराने सतत पैशांसाठी तगादा सुरू केला. दिवसेंदिवस मुद्दल आणि व्याज वाढत गेले, रक्कम खूप मोठी झाली. शेवटी सावकारानेच रोशनला पैशांसाठी स्वतःची किडनी विकण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्ल्यावरून रोशन प्रथम कोलकात्यात गेला आणि नंतर कंबोडियात जाऊन आपली किडनी आठ लाख रुपयांना विकली. ही शस्त्रक्रिया कंबोडियात झाली.
सावकारामुळेच माझ्यावर ही भयंकर वेळ आलीय – पिडित शेतकरी
सावकारामुळेच माझ्यावर ही भयंकर वेळ आलीय, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तसेच सावकाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करते. तेव्हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती वाईट आहे, हे यातून स्पष्ट होते. शेतकरी गरिबीने आणि कर्जाने किती हैराण आहेत, याचे वास्तव सांगणारे ही घटना आहे. शेतकऱ्याला किडनी विकायला भाग पाडणाऱ्या सावकरावर काय कारवाई होणार? राज्य सरकार आणि कृषी विभाग कशी त्वरित कारवाई करतात आणि त्या सावकाराला शिक्षा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












