Salman Khan Health Update: ‘वीकेंड का वार’दरम्यान सलमान खानच्या छातीत अचानक दुखू लागल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या घटनेचा कथित व्हिडिओही व्हायरल होत असून, शोमध्ये नेमकं काय घडलं याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘बिग बॉस २०’ चा आगामी ‘वीकेंड का वार’ सध्या चर्चेत आला आहे. या भागाच्या प्रोमोमध्ये होस्ट सलमान खानसोबत घडलेला एक प्रसंग पाहून प्रेक्षकांना धक्का बसला. सलमान अचानक अस्वस्थ झाल्याचं आणि त्यानंतर मंचावर कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं. त्यामुळे नेमकं काय झालं, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता.
प्रोमोमध्ये सलमान खान छातीवर हात ठेवताना दिसतो. त्याला त्रास होत असल्याचं जाणवताच तो डॉक्टरांना बोलण्यास सांगतो. काही क्षणांतच तो मंचावर खाली पडतो. सलमानची ही अवस्था पाहून कार्यक्रम पाहणाऱ्या चाहत्यांची चिंता वाढली. सोशल मीडियावरही या प्रोमोची मोठ्या प्रमाणत चर्चा सुरू झाली.
मात्र, या दृश्यामागे सलमानच्या प्रकृतीशी संबंधित कोणतीही गंभीर बाब नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. स्वतः सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत या संपूर्ण घटनेमागचं कारण सांगितलं आहे.
सलमानने चाहत्यांना दिली महत्वाची माहिती
व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे गैरसमज निर्माण झाल्यानंतर सलमानने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्पष्टीकरण दिलं. त्याने आपल्या तब्येतीबाबत कोणतीही समस्या नसल्याचं स्पष्ट केलं.
सलमानने सांगितलं की, प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेला प्रसंग हा एका विशिष्ट मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आला होता. घरातील स्पर्धक काझी तौकीरने यापूर्वी आपल्या आरोग्याशी संबंधित प्रसंगाचा मनोरंजनासाठी वापर केला होता. त्या वेळी घरातील इतर सदस्यांना परिस्थिती खरी की खोटी, याची माहिती नव्हती आणि त्यामुळे ते चिंतेत पडले होते.
View this post on Instagram
काझीच्या या वागण्याचं गांभीर्य त्याला समजावून सांगण्यासाठी सलमानने त्याच्याच कृतीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रोमो एडिट करताना हा संदर्भ स्पष्टपणे समोर न आल्यामुळे सलमानच्या तब्येतीबाबत चुकीचा अर्थ निघाला, असं त्याने सांगितलं.
प्रोमोच्या एडिटिंगवर सलमानची नाराजी
सलमानने प्रोमो ज्या पद्धतीने कट करण्यात आला त्यावरही भाष्य केलं. त्याच्या मते, दृश्याचा मूळ संदर्भ बाजूला पडल्याने प्रेक्षकांना वेगळाच संदेश गेला. त्यामुळे झालेल्या गैरसमजाबद्दल त्याने माफी मागितली.
यानंतर सलमानने आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. ‘बिग बॉस’कडून या प्रोमोमध्ये बदल करण्यात आल्याचं त्याने सांगितलं आणि त्याबद्दल आभार व्यक्त केले.


काझी तौकीरला सलमान सुनावणार?
दरम्यान, निर्मात्यांनी शेअर केलेल्या नव्या प्रोमोमधून आगामी भागात काझी तौकीरचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचं दिसत आहे. सलमान घरातील सर्व स्पर्धकांसमोर काझीच्या वर्तनाबाबत थेट चर्चा करताना दिसतो.
काझीने केलेल्या प्रकारामुळे घरातील इतर सदस्यांवर त्याचा कसा परिणाम झाला, यावरही सलमान बोलताना दिसणार आहे. त्यामुळे ‘वीकेंड का वार’मध्ये काझीला सलमानकडून काय सुनावलं जाणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
ट्रोलिंगवरही सलमान भडकला
या भागात सलमान खान आणखी एका मुद्द्यावर आपली भूमिका मांडताना दिसणार आहे. महिला कलाकारांच्या कपड्यांवर आणि लूकवरून सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय, स्वतःच्या आरोग्याबाबत तसेच त्याच्या लूकवरून केल्या जाणाऱ्या विविध चर्चांवरही सलमानने प्रतिक्रिया दिल्याचं प्रोमोमधून समोर आलं आहे.
एकूणच, सलमानच्या तब्येतीबाबत निर्माण झालेला संभ्रम त्याच्या स्पष्टीकरणामुळे दूर झाला असून, ‘बिग बॉस २०’चा हा ‘वीकेंड का वार’ काझी तौकीरच्या मुद्द्यासह सलमानच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येण्याची चिन्हं आहेत.









