अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head
Pune Ganeshotsav 2026 : “पुण्याचा गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा विषय असला, तरी मुळात हा उत्सव पुणेकरांचा आहे. गणेशोत्सव आणि लोकसहभाग या वेगळ्या गोष्टी असूच शकत नाहीत. त्यामुळे पुणेकरांना अभिप्रेत आणि अपेक्षित असाच गणेशोत्सव साजरा केला जाईल. सर्वसामान्य पुणेकरांचा सहभाग अधिकाधिक वाढवून हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘लोकोत्सव’ म्हणून अधिक व्यापक करू,” अशी ग्वाही केंद्रीय सहकारिता आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांनी गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून दिली.
टपाल विभागातर्फे पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे सोमवारी (२१ सप्टेंबर) आयोजित कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. यावेळी ‘गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या विषयावरील विशेष टपाल आवरणाचे मोहोळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुण्याच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सव परंपरेची नोंद टपालाच्या माध्यमातून देशभर पोहोचविण्याच्या उद्देशाने मोहोळ यांनी ही संकल्पना पोस्ट खात्याकडे मांडली होती. यावेळी आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, टपाल विभागाच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल, टपाल सेवा संचालक अभिजित बनसोडे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके उपस्थित होते.
पुण्याच्या गणेशोत्सव परंपरेचा टपाल विभागाकडून गौरव ( Pune Ganeshotsav 2026 )
मोहोळ म्हणाले, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला समाजजागृती आणि लोकसंघटनाचे प्रभावी माध्यम बनवले. अनेक पिढ्यांनी या उत्सवातील स्थित्यंतरे पाहिली आहेत. काळानुसार स्वरूप बदलले असले, तरी पुण्याच्या गणेशोत्सवाचा मूळ आत्मा लोकसहभाग हाच आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते या परंपरेचे वाहक आहेत आणि त्यांना या उत्सवाचा निश्चितच अभिमान आहे; मात्र हा उत्सव केवळ मंडळांचा किंवा कार्यकर्त्यांचा नसून संपूर्ण पुणेकरांचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला हा उत्सव आपला वाटला पाहिजे. हीच पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी ताकद आहे.”
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देऊन या परंपरेचा राज्यपातळीवर गौरव केला आहे. त्यासाठी विधिमंडळात मागणी करणारे आमदार हेमंत रासने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे मोहोळ यांनी अभिनंदन केले. “राज्यपातळीवरील सन्मानानंतर आता विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा देशपातळीवर पोहोचत आहे. आपल्या वैभवशाली परंपरेचे जतन करत ती अधिक समृद्ध करणे आणि जगभर पोहोचविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे मोहोळ म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकास आणि विरासत’ या भूमिकेचा उल्लेख करत मोहोळ म्हणाले की, “२०४७ पर्यंत विकसित भारत घडविताना विकासासोबत आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतनही तितकेच महत्त्वाचे आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा आपल्या समृद्ध सांस्कृतिक विरासतीचा महत्त्वाचा भाग आहे. या परंपरेचे जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे.”
हेही वाचा : लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान! 5 दिवसांत किती पैसा, सोने-चांदी
गणेशोत्सवाच्या टपाल तिकिटासाठी महापालिकेने ठराव करावा ( Murlidhar Mohol )
पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक नोंद अधिक व्यापक स्वरूपात कायमस्वरूपी जतन व्हावी, यासाठी गणेशोत्सवाचे स्वतंत्र टपाल तिकीट प्रकाशित करण्याची अपेक्षाही मोहोळ यांनी व्यक्त केली. “आज विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन झाले आहे. आता पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या स्वतंत्र टपाल तिकिटासाठी ठराव करावा. महापौरांनी पुढाकार घेऊन टपाल विभागाकडे त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील वर्षापर्यंत पुण्याच्या गणेशोत्सवाचे स्वतंत्र टपाल तिकीट प्रकाशित व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे,” असे मोहोळ म्हणाले.









