Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अजितदादांच्या निधनादिवशी भाजप नेत्याकडून मटन पार्टी आणि मिठाईचे वाटप; महिलांनी निषेध व्यक्त
Pune

अजितदादांच्या निधनादिवशी भाजप नेत्याकडून मटन पार्टी आणि मिठाईचे वाटप; महिलांनी निषेध व्यक्त

BJP Leader Meat Party Protest
104

BJP Leader Meat Party Protest : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करत होता. मात्र, मावळ तालुक्यात घडल्याला एका घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आता संतापाची लाट उसळली आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी राज्यभर पसरताच सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत हळहळ व्यक्त होत असताना, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी दोन दिवस प्रचार थांबवत शोक व्यक्त केला होता. मात्र, याच काळात मावळातील एका भाजप नेत्याने चिखलसे आणि अहिरवडे गावात मटन पार्टी आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम घेतल्याची चर्चा रंगली असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर महिलांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – अजितदादांच्या आवडीचे अर्थ खाते सुनेत्रा पवारांना नाहीच! कमी महत्त्वाची ‘ही’ ३ खाते सोपवली..

“निवडणुका येतात आणि जातात, विजय-पराजय होत असतो; पण एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर अशा प्रकारचं वर्तन अयोग्य आणि असंवेदनशील आहे,” अशी भावना विशेषतः तालुक्यातील महिलांकडून व्यक्त होत आहे. शोककाळात जल्लोषासारखा भासणारा कोणताही कार्यक्रम समाजमनाला वेदना देणारा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मावळ तालुक्याशी अजित पवार यांचं भावनिक नातं असल्याची भावना नागरिकांमध्ये खोलवर आहे. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, अशी आठवण नागरिक काढताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या दिवशीच कथित कार्यक्रम झाल्याची चर्चा अधिकच चटका लावणारी ठरत आहे.

संबंधित नेता पूर्वी राष्ट्रवादी असून अलीकडेच भाजपमध्ये दाखल

संबंधित नेता पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून अलीकडेच भाजपमध्ये दाखल झाल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. अजित पवार यांनी दिलेल्या संधी, पदे आणि राजकीय पाठबळाचा उल्लेख करत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “उपकार विसरण्याची ही घाई कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित होत असून, शोककाळातील संवेदनशीलतेबाबत राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित घटना राजकीय वादळ निर्माण करण्याची चिन्हं

एकूणच, अजित पवार यांच्या निधनानंतर मावळ तालुक्यात निर्माण झालेलं भावनिक वातावरण आणि त्याच पार्श्वभूमीवर झाल्याचा आरोप असलेला कार्यक्रम यामुळे राजकीय तापमान वाढलं आहे. संबंधित नेत्याकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नसल्याने चर्चा आणखी रंगत असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही घटना राजकीय वादळ निर्माण करण्याची चिन्हं दिसत आहेत. या नेत्याची परिसरात एवढी दहशत आहे की, स्थानिक नागरीक त्याचे नाव घेण्यास देखील घाबरत आहेत. त्यामुळे पुढील काळात तरी या नेत्याचे नाव घेण्यास कोणी पुढं येतंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts