• Home
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवरील सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची उसळली गर्दी
Top News

महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवरील सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची उसळली गर्दी

Crowd of devotees on the occasion of Mahashivaratri

Crowd of devotees on the occasion of Mahashivaratri : अमरावती जिल्ह्यालगत असलेल्या महाराष्ट्र –मध्यप्रदेश सीमेवरील निसर्गरम्य सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली. सालबर्डी हे सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले प्राचीन धार्मिक स्थळ असून येथे नैसर्गिक खडकातील गुहेत स्वयंभू महादेवाचे शिवलिंग आहे. या पवित्र स्थळाविषयी भाविकांमध्ये प्रगाढ श्रद्धा असून महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.

हेही वाचा – उन्हाळ्यापूर्वीच मूर्तिजापूरत पाणीटंचाई;‘आम्ही माणसं आहोत की जनावरं? नागरिकांचा संतप्त सवाल

यंदाही महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील हजारो भाविक पहाटेपासून दर्शनासाठी दाखल झाले. मंदिर परिसरात रुद्राभिषेक, भजन-कीर्तन, हरिनाम संकीर्तन व सामूहिक पूजाअर्चा भक्तिभावाने पार पडली. गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेताना भाविकांनी “हर हर महादेव”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

सालबर्डी परिसरातील प्राचीन लेण्या मध्ययुगीन कालखंडातील मानल्या जातात. खडकात कोरलेल्या रचनांमध्ये साधेपणा व उपासनेची परंपरा दिसून येते. ‘पांडव कचेरी’ म्हणून ओळखली जाणारी दगडी रचना स्थानिक लोकपरंपरेत विशेष महत्त्व राखते. काही इतिहास अभ्यासकांच्या मते, येथील स्थापत्यावर प्रारंभीच्या बौद्ध शैलीचा प्रभाव जाणवतो.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला. श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम जपणारे सालबर्डी हे विदर्भ व मध्यप्रदेशातील भाविकांसाठी महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts