• Home
  • ताज्या बातम्या
  • टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरुच; श्रीलंकेविरुद्ध जिंकला सलग चौथा सामना
क्रीडा

टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरुच; श्रीलंकेविरुद्ध जिंकला सलग चौथा सामना

INDW vs SLW 4th T20I

INDW vs SLW 4th T20I : भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना जिंकला आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारतानं लक्ष्याचा पाठलाग केला होता. तर या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 30 धावांनी विजय मिळवला. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माच्या अर्धशतकांमुळं संघानं 2 बाद 221 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेनं सहा बाद 191 धावा केल्या, जी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु तरीही पराभवाला सामोरं जावं लागलं.

पहिल्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी :

पहिल्या तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर, स्मृती मंधानानं 48 चेंडूंच्या डावात 11 चौकार आणि तीन षटकारांसह 80 धावा काढल्या. शेफालीनं तिच्या सलग तिसऱ्या अर्धशतकादरम्यान 46 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि एका षटकारासह 79 धावा काढल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली, जी या फॉरमॅटमध्ये कोणत्याही विकेटसाठी भारताची आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी आहे. दोघांनाही शतकं ठोकण्याची संधी होती पण ती हुकली. (INDW vs SLW 4th T20I)

सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम :

ऋचा घोष (16 चेंडूत नाबाद 40) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (16 नाबाद) यांनी 23 चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची नाबाद भागीदारी करुन भारताला या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या गाठून दिली. याआधी डिसेंबर 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध संघानं चार बाद 217 धावा केल्या होत्या. भारतानं त्यांच्या डावात 28 चौकार आणि आठ षटकार मारले होते, ज्यामुळं या फॉरमॅटमध्ये संघाकडून सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. श्रीलंकेकडून निमाशा मदुशानी आणि मालशा शेहानी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

श्रीलंकेनंही केली स्फोटक फलंदाजी :

प्रत्युत्तरादाखल, श्रीलंकेचा संघ सहा विकेट गमावून केवळ 191 धावा करु शकला. कर्णधार चामारी अथापथ्थूनं संघाकडून सर्वाधिक 52 धावा केल्या. तिच्या खेळीत तीन षटकार आणि तेवढेच चौकार होते. हसिनी परेरानं 20 चेंडूत 7 चौकारांसह 33 धावा केल्या, तर इमेशा दुलानीनं 29 धावा केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर श्री चरणीनं 1 बळी घेतला. दोन्ही देशांमधील मालिकेतील शेवटचा सामना 30 डिसेंबर रोजी याच मैदानावर खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ विजय मिळवून सन्मान राखण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, भारत मालिकेत 5-0 असं क्लीन स्वीप करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts