Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • मोदींचे एक आव्हान आणि सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम
Top News

मोदींचे एक आव्हान आणि सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम

Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदीनी वाढत्या सोन्या-चांदीच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्या-चांदीची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मौल्यवान धातूंच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार आणि वाढती गुंतवणूक यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले मोदी ?

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि खतांच्या किमती वाढत असतानाच, जागतिक पुरवठा साखळीवरही ताण निर्माण झाला आहे. वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाढणारा ताण लक्षात घेता, नागरिकांनी पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी आणि अनावश्यक परदेश प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. रविवारी हैद्राबाद येथे आयोजित एका सभेत बोलताना मोदी म्हणाले की, “देशाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची भूमिका घेणे आवश्यक आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, मोठ्या प्रमाणावर होणारी सोन्याची आयात देशाच्या परकीय चलन साठ्यावर परिणाम करत असून, त्याचा थेट प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडतो. याचसोबत पेट्रोल व डिझेलचा वापर सुद्धा कमी करण्याचे आवाहन सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारतात सोन्याचे महत्व?

भारतीय संस्कृती, परंपरा आणि आर्थिक सुरक्षिततेमध्ये सोन्याला विशेष स्थान आहे. देशातील अनेक कुटुंबांसाठी सोने हे केवळ दागिने किंवा गुंतवणूक नसून, ते प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि भावनिक जिव्हाळ्याचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभ, सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि शुभकार्यांमध्ये सोन्याची खरेदी ही परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. विशेषतः ग्रामीण भागात आजही सोने हे आर्थिक अडचणीच्या काळात आधार देणारे सर्वात विश्वासार्ह साधन समजले जाते. भारतीय नागरिकांचा सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ आकर्षणापुरता मर्यादित नाही, तर भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. महागाई, आर्थिक अस्थिरता किंवा बाजारातील चढ-उतारांच्या काळात अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याच कारणामुळे भारत हा जगातील सर्वाधिक सोन्याची खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो. मात्र, वाढत्या आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने, सरकारकडून वेळोवेळी संयमित खरेदीचे आवाहन केले जात आहे.

 

सोन्याचा दरात घसरण?

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सोन्याच्या बाजारात तत्काळ परिणाम दिसून आला असून सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. या आवाहनानंतर सोन्याचा किमतीत आणखी मोठी घसरण होऊ शकते असा अंदाज सगळ्यांना दिसून येतो. या अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या आवाहनाचा थेट परिणाम मागणीवर झाला असून, सोन्याच्या खरेदीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दरांवर दबाव निर्माण होऊन ही मोठी घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.

आता या सगळ्या आवाहनांचा येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेवर आणि जनसामान्यांवर  काय परिणाम होतो याकडे लक्ष आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts