• Home
  • राजकारण
  • अखेर नरेंद्र मोदींनी नेहरूंच्या नावावर असलेला ‘तो’ महाविक्रम मोडलाच….
Top News

अखेर नरेंद्र मोदींनी नेहरूंच्या नावावर असलेला ‘तो’ महाविक्रम मोडलाच….

Narendra Modi breaks Nehru record

Narendra Modi breaks Nehru record : एका बाजूला आधुनिक भारताचा पाया रचणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या बाजूला गेल्या १२ वर्षांत भारताच्या राजकारणाचा चेहरामोहरा पूर्ण बदलून टाकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी. दोन वेगवेगळ्या विचारसरणी, दोन वेगवेगळे कालखंड आणि दोघांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धती. देशाच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेलाय. सलग तीन वेळा जनतेचा कौल मिळवत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पंतप्रधानपदावरील ४,३९८ दिवसांच्या कार्यकाळाचा हा महाविक्रम मोडीस काढला आहे. जरी विक्रम मोडला असला तरी दोघांच्या कारकिर्दीत विश्वासनीय फरक आहे.

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये जेव्हा दिल्लीच्या गादीवर आले, तेव्हा देशात एक वेगळीच हवा होती. यूपीए सरकारच्या काळातील घोटाळे, महागाई आणि निर्णयक्षमतेचा अभाव याला कंटाळलेल्या जनतेला मोदींच्या रूपाने एक खंबीर आणि आक्रमक नेता दिसला. मोदींनी पहिल्याच निवडणुकीत अच्छे दिनचा असा काही नारा दिला की, देशातील तरुणाई आणि मध्यमवर्ग त्यांच्या प्रेमातच पडला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला एकट्याला २८२ जागा मिळाल्या आणि इथून सुरू झाली मोदी लाट. पण राजकारणात एकदा जिंकणं सोपं असतं, ती पकड टिकवून ठेवणं सर्वात कठीण असतं. मोदींनी ती पकड कशी टिकवली? तर त्याचं उत्तर आहे कनेक्ट.

दिल्लीच्या व्हीआयपी संस्कृतीला आव्हान

मोदींनी स्वतःला प्रधानसेवक, चौकीदार, चहावाला म्हणून सादर केलं. दिल्लीच्या व्हीआयपी संस्कृतीला आव्हान देत त्यांनी आपण सर्वसामान्य गरिबांचे प्रतिनिधी आहोत, हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला. याचा थेट फायदा २०१९ च्या निवडणुकीत झाला. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकने देशात राष्ट्रवादाची एक अशी लाट निर्माण केली, ज्याने विरोधकांना पुरतं वाहून नेलं. २०१९ मध्ये भाजपची घोडदौड ३०३ जागांवर पोहोचली. मतदारांनी मोदींच्या नावावर अक्षरशः मतांचा पाऊस पाडला.

इंडिया आघाडी करून मोदींना घेरण्याचा प्रयत्न

२०२४ ची निवडणूक काहीशी वेगळी आणि आव्हानात्मक होती. विरोधकांनी इंडिया आघाडी करून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. १० वर्षांची अँटी-इन्कम्बन्सी आणि बेरोजगारी-महागाईचे मुद्दे समोर होते. तरीही, देशातील जनतेने नरेंद्र मोदींवरचा विश्वास पूर्णपणे कमी होऊ दिला नाही. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मोदींच्याच नेतृत्वाखाली एनडीए सरकारने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पंतप्रधानपदावरील ४,३९८ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडून काढला आहे. यापुढे त्यांचा नवा विक्रम रचला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts