• Home
  • राजकारण
  • ठाकरेंना मोठा धक्का! ‘ऑपरेशन टायगर’ शिंदे ठरवतील त्या दिवशी; केंद्रीय मंत्र्यांचा दावा…
Top News

ठाकरेंना मोठा धक्का! ‘ऑपरेशन टायगर’ शिंदे ठरवतील त्या दिवशी; केंद्रीय मंत्र्यांचा दावा…

Operation Tiger on Shinde's Decision

Operation Tiger on Shinde’s Decision : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदे गटातील राजकीय घुसखोरीच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी आज ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत ठाकरे गटात खळबळ माजवली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथे एका हर्बल फार्मा कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, “ऑपरेशन टायगर आता पूर्णत्वाकडे गेले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जेव्हा योग्य वेळ आणि मुहूर्त पाहतील, तेव्हा हे ऑपरेशन पूर्ण होईल.”जाधवांनी यावेळी उबाठा नेते अंबादास दानवे यांच्या विधानाचा संदर्भही दिला. ते म्हणाले, “दानवे यांनी अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. त्यामुळे आम्हाला याबाबत अधिक बोलण्याची गरज नाही.”

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

अंबादास दानवे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “काही लोक संपर्कात आहेत, तर काही उघड उघड बोलतात. आम्हाला सर्व माहिती आहे. लोकसभा निवडणुकीपासून महिना-दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. आता हे अधिकृत मान्य करायला हवे.” दानवेंच्या या विधानाचा जाधवांनी मुद्दाम उल्लेख करून ठाकरे गटावर दबाव वाढवला आहे.

संजय राऊतांचा तीव्र पलटवार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला ‘महाराष्ट्रातील विकृती’ म्हटले आहे. राऊत म्हणाले, “ही महाराष्ट्रातील विकृती आहे. त्यांनी कळस गाठला आहे. महाराष्ट्र यांनी नासवला असून योग्य वेळी जनता या विरोधात बंड करेल.” त्यांनी अमित शाह यांच्या ‘ऑपरेशन’चा टोलाही लगावला.

उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या १४ जून २०२६ रोजी मातोश्री निवासस्थानी शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी सर्व खासदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कथित मोहिमेमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. शिंदे गट मात्र या चर्चांना ‘आत्मविश्वासपूर्ण’ म्हणत आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा गरम झाली आहेत. उद्याच्या मातोश्री बैठकीत काय निर्णय होतात आणि ठाकरे गट यावर कशी रणनीती आखतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts