• Home
  • महाराष्ट्र
  • प्रणित मोरे मोठ्या अडचणीत; गृह विभागाकडून सर्व व्हिडीओंची सखोल चौकशी
Top News

प्रणित मोरे मोठ्या अडचणीत; गृह विभागाकडून सर्व व्हिडीओंची सखोल चौकशी

Pranit More Video Probe

Pranit More Video Probe : लोकप्रिय कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या स्टँड-अप शोमधील अश्लील आणि विकृत विनोदांमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. अलीकडेच व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे प्रणित मोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून, गृह विभागाने यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात महिला आयोगानेही नोटीस बजावली असून, सायबर पोलिसांकडून अपलोड केलेल्या सर्व कंटेंटची सखोल तपासणी सुरू झाली आहे.

गृह विभाग राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली. “विकृत विनोद करणे उचित नाही. याची सखोल चौकशी होईल. समाजात कोणीही अशाप्रकारचे विनोद करू नये,” असे भोयर यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, फक्त दोन व्हायरल व्हिडीओ नव्हे तर प्रणित मोरे यांच्या शोमधील सर्व पूर्वीचे व्हिडीओ तपासले जातील. या प्रकरणात केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल केलेले धक्कादायक विधान आणि एका मुलाने सांगितलेला बिर्याणीचा किस्सा यामुळे जनआक्रोश अधिक वाढला आहे.

संबंधित महिला डॉक्टरवरही कारवाई करण्याची प्रक्रिया

प्रणित मोरे यांच्या शोमध्ये वारंवार अश्लील सामग्री वापरल्याने ते यापूर्वीही वादात सापडले होते. मात्र यावेळी प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचे दिसते. अनेकांकडून त्यांच्या शोवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर संबंधित महिला डॉक्टरवरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिला आयोगाने नोटीस जारी करून मागितले उत्तर

पंकज भोयर यांनी यावेळी देहदानाच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. “आपला देह समाजासाठी कामाला यावा म्हणून लोक देहदान करतात. अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य होणे निंदनीय आहे. असे कृत्य करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले. महिला आयोगानेही या प्रकरणात तातडीने नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे.सायबर सेल सक्रिय झाले असून, प्रणित मोरे यांच्या शोचे व्हिडीओ, लाईव्ह सेशन्स आणि सोशल मीडिया कंटेंट यांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रणित मोरे यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही.

विविध संघटनांकडून योग्य कारवाई करण्याची मागणी

सध्या सोशल मीडियावर या विषयावर प्रचंड चर्चा सुरू आहे. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुद्दे उपस्थित केले जात असताना, दुसरीकडे समाजातील नैतिक मूल्ये आणि महिला-बालकांच्या संवेदनशीलतेचा विचार करून मर्यादा पाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून योग्य कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts