• Home
  • राजकारण
  • विश्वास, वाद अन् रणनीती! राज्यसभा रणांगणापूर्वी ठाकरे गटात खळबळ; बैठकीतील इनसाईड अपडेट्स समोर
Top News

विश्वास, वाद अन् रणनीती! राज्यसभा रणांगणापूर्वी ठाकरे गटात खळबळ; बैठकीतील इनसाईड अपडेट्स समोर

thackeray group

Uddhav Thackeray | सध्या राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे ते राज्यसभा निवडणुकांकडे. तर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (UBT Group) आज एक बैठक पार पडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत (Mumbai) खासदारांची बैठक बोलावली होती. तर या बैठकीनंतर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कारण वरवर साधी बैठक वाटणारी ही चर्चा प्रत्यक्षात मात्र पक्षातील अंतर्गत घडामोडींचे मोठे संकेत देऊन गेल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – अशोक खरात प्रकरण तापलं! अश्लील व्हिडीओ तात्काळ डिलीट करण्याचे आदेश; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, आरोपींवर गुन्हा दाखल

मातोश्रीवर पार पडली खासदारांची महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी उपस्थित खासदारांचा विश्वास जिंकण्यासाठी मोठं वक्तव्य केलं. मला भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून समजलं की तुमचे खासदार फुटणार आहेत. मात्र, माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि ही लढाई मी तुमच्या सर्वांच्या भरवश्यावर लढत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यसभेच्या जागेसाठी के. सी वेणुगोपाल, मल्लीकार्जून खरगे आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी विरोधी पक्षाच्यापदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. यावर उद्धव ठाकरेंनी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार आहे? असं उत्तर देत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संभाव्य वाद टाळण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे ठाकरेंनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर उद्धव ठाकरे बैठकीत बोलत असतानाच प्रियंका चतुर्वेदींनी मध्येच हस्तक्षेप करत उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला.

ठाकरे गटाच्या बैठकीत अचानक भडकल्या प्रियंका चतुर्वेदी, नेमकं काय म्हणाल्या?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी बैठकीत भडकल्या होत्या. मला निषेध करायचा आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं? असा सवाल थेट प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की संजय राऊत बोलले म्हणून काय झालं? मी पक्षप्रमुख आहे. त्यामुळे शेवटी निर्णय मीच घेईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, बैठकीतील या घडामोडींमुळे ठाकरे गटात आगामी राजकीय निर्णय अधिक सावधपणे घेतले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत समन्वय मित्रपक्षांसोबतचे संबंध आणि पक्षातील नेतृत्वाची भूमिका यावर आता अधिक लक्ष केंद्रीत होणार आहे. भावनिक एकजूट आणि राजकीय वास्तव यांचा समतोल साधत पुढील रणनीती ठरवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले असून, येणाऱ्या काळात ठाकरे गट कोणता निर्णायक पाऊल उचलतो, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts