Breaking News :
Pune

पुणे जिल्ह्यात रंगेहात लाचकरी SDO अटक; नेमके प्रकरण काय?

pune news

​Pune SDO caught taking bribe: पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे कार्यालयीन सहकारी खैरनार यांना २ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर- आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी (SDO) तथा उपविभागी दंडाधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६) आणि त्यांचे कार्यालयीन सहकारी खैरनार यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या लाचे मागणीचे कारण म्हणजे एका इमारतीचा अंशतः पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) देणे.

हेही वाचा: नवीन फोन घेतलात? लगेच ऑन करा ही 5 सुरक्षा सेटिंग्ज, नाहीतर डेटा चोरीचा धोका!

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार हा एका बांधकाम व्यवसायातील भागीदार असून त्यांनी पुणे- नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असल्यामुळे त्यांनी अंशतः पूर्णत्वाचा दाखल मिळवण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सर्व तांत्रिक विभागांची मंजुरी मिळूनही गोविंद शिंदे यांनी हा प्रस्ताव स्वतःकडे राखून ठेवला.

५ लाखांची मागणी, २ लाखांवर तडजोड

दि. २० मार्च २०२६ रोजी तक्रारदार प्रस्तावाच्या चौकशीसाठी गेले असता, शिंदे यांनी हा दाखला देण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत २४ मार्च रोजी ACB पुणे यांच्याकडे तक्रार नोंदवली. नंतर २७ मार्च रोजी पडताळणी दरम्यान २ लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले.

एसीबीचा सापळा आणि कारवाई

आज दुपारी १५:०३ वाजता मंचर येथील शासकीय कार्यालयात तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने गोविंद शिंदे यांना रंगेहात ताब्यात घेतले. आरोपी गोविंद शिंदे हे मूळचे सिन्नर (नाशिक) येथील असून सध्या प्रभात रोड, पुणे येथे वास्तव्यास आहेत.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, प्रविण निंबाळकर व त्यांच्या पथकाने केली.

पुढील कायदेशीर प्रक्रिया

याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास एसीबीकडून वेगाने पार पडला जात आहे, आणि आरोपींच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts