Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं! बळजबरीने गर्भपात, घरातच शस्त्रक्रियेचा घाट
Top News

पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं! बळजबरीने गर्भपात, घरातच शस्त्रक्रियेचा घाट

Abortion

Forced Abortion Home Surgery : आपण 21 व्या शतकात जगतोय.. मुलगा मुलगी समानतेचे धडे गिरवतोय.. प्रत्यक्षात समान वागणुकीची अपेक्षा ठेवत तसं जगतोय.. मात्र आजही या 21 व्या शतकात मुलगा मुलगी असा भेदभाव करणारी विचित्र मानसिकता वावरतेय.. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हट्टापायी आजही मातृत्वाच्या पवित्र क्षणांना उद्ध्वस्त केलं जातंय.. कळी खुलण्याआधीच पोटच्या गोळ्याची पोटात क्रूर हत्या केली जातेय.. अशीच एक क्रूर घटना संभाजीनगरमधून समोर आलीय..

हेही वाचा – ‘तुमचा बाप जयराम चाटे येतोय’ रक्तरंजीत बीड, गुन्हेगारीची कीड!

डॉक्टर, परिचारिका आणि पीडितेच्या पतीसह सासू-सासऱ्याला अटक

मुलगाच हवा या हट्टापायी एका २६ वर्षीय विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय घरातच बळजबरीने गर्भपात केल्याचा संतापजनक प्रकार संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात उघडकीस आलाय. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी मोठी कारवाई करत डॉक्टर, परिचारिका आणि पीडितेच्या पतीसह सासू-सासऱ्याला अटक केलीय..

पीडित विवाहितेला पाच आणि दोन वर्षांच्या दोन मुली

दोन मुलींनंतर तिसऱ्यांदाही पदरात मुलगीच पडणार असल्याचं समजताच सासरच्या मंडळींनी बोगस डॉक्टरांच्या मदतीने एका विवाहितेचा घरातच गर्भपात केला. पीडित विवाहितेला पाच आणि दोन वर्षांच्या दोन मुली आहेत. ती तिसऱ्यांदा पाच महिन्यांची गरोदर असताना, पती अरबाजने जालन्याचा सतीश सोनवणे, कमळ गोकूळ तिनगोटे अन्य एका पुरुषांला घरी बोलावले. याच टोळक्याने घरीच तिची बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केली…

विवाहितेच्या घरातच तिचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केलं

या घटनेतील मोठी बाब म्हणजे हे संपूर्ण रॅकेट अत्यंत छुप्या पद्धतीने चालवले जात होते. पीडित विवाहितेच्या पतीने डॉ. सतीश सोनवणे याला गर्भपातासाठी सुपारी दिली होती. डॉ. सोनवणे याने ट्रिमरच्या आकाराच्या एका पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा वापर करून विवाहितेच्या घरातच तिचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले. पोटात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच, सासरच्या मंडळींनी डॉक्टर आणि एका परिचारिकेच्या मदतीने तिचा गर्भपात करण्याचा घाट घातला. 6 मार्च रोजी विवाहितेला गुंगीचं औषध देऊन तिचा गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, याचदरम्यान विवाहितेचे वडील अचानक तिथे पोहोचले. त्यांना पाहताच डॉक्टर आणि त्याचे साथीदार साहित्य सोडून पसार झाले. मात्र, तोपर्यंत विवाहितेचा गर्भपात झाला होता. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हाती लागले.

विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय घरातच बळजबरीने गर्भपात

एका २६ वर्षीय विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय घरातच बळजबरीने गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी कारवाई करत गर्भपाताचे रॅकेट चालवणारा कुख्यात डॉक्टर, एक परिचारिका तसेच पीडितेचा पती आणि सासू-सासऱ्याला अटक केली आहे… अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. सतीश सोनवणे, अरबाज सय्यद, फिरोज सय्यद, आशिया सय्यद, कमल तिनगोटे आणि अनिल जाधव यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असल्याची माहिती डिसीपी प्रशांत स्वामी यांनी दिलीय.

वंशाच्या दिव्याच्या नावाखाळी तिची प्राणज्योत गर्भातच मालवण्याचा प्रयत्न

मुली वाचवण्यासाठी सरकारनं विशेष मोहीम हाती घेतली… बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या घोषणा दिल्या… त्यातूनच देशाला सानिया मिर्झा, मनू भाकर, दिव्या देशमुख, सोफीया कुरेशी, व्योमिका सिंह अशा प्रत्येक क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या महिला पुढे आल्या… एकीकडे आपण मुलीला घरची लक्ष्मी बोलतो आणि दुसरीकडे वंशाच्या दिव्याच्या नावाखाळी तिची प्राणज्योत गर्भातच मालवण्याचा प्रयत्न करतो… हे कटू वास्तव आहे… ही नालायक मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत अशा निरागस लक्ष्मींचा बळी जातच राहणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts