• Home
  • ताज्या बातम्या
  • विरार उड्डाणपुलावरील गर्डरला टेम्पोची धडक; गर्डर कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी
Mumbai

विरार उड्डाणपुलावरील गर्डरला टेम्पोची धडक; गर्डर कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी

Virar Flyover Girder Accident

Virar Flyover Girder Accident : विरार रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी गर्डर एका टेम्पोच्या धडकेत कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे काही काळ पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यामुळे अनेक नागरीकांना मानसिक ताणाचा सामना करावा लागला. तर काहींना या कोंडीतून मार्ग काढवा लागला.

हेही वाचा – मीरा-भाईंदर महापालिका अॅक्शन मोडवर, मीरा रोडच्या सृष्टी परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

विरार पूर्व–पश्चिम भागाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकांना उंची मर्यादा दर्शविणारे गर्डर बसवण्यात आले आहेत. मात्र, नियम धाब्यावर बसवून काही टेम्पो व बस चालक उड्डाणपुलावरून प्रवास करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

मंगळवारी दुपारी पूर्वेकडील बाजूकडून जाणाऱ्या एका टेम्पोने गर्डरच्या खांबाला जोरदार धडक दिली. या धडकेत गर्डर एका बाजूने खाली कोसळला आणि टेम्पो त्यात अडकला. परिणामी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मनसेचे पदाधिकारी दिनेश अहिरे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

जेसीबीच्या साहाय्याने कोसळलेला गर्डर हटवण्याचे काम करण्यात आले. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नगरसेविका ममता सुमन यांची उपस्थिती होती. दरम्यान, गर्डरला घासून किंवा जबरदस्तीने उड्डाणपुलावरून टेम्पो व बस नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा नियमभंग करणाऱ्या अवजड वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts