Pune Traffic : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आता जागतिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरली आहे. नेदरलँड्सस्थित टॉमटॉम (TomTom) या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केलेल्या 2025 ट्रॅफिक इंडेक्स अहवालानुसार, जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराने पाचवे स्थान पटकावले आहे. या अहवालामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा किती मोठा फटका बसतो याचे वास्तव समोर आले आहे.
2025 मध्ये पुणेकरांचे 152 तास वाहतुकीत वाया
अहवालानुसार, 2025 मध्ये वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचे तब्बल 152 तास, म्हणजेच 6 दिवस 8 तास वाया गेले. पुण्यातील वाहतूक कोंडीची ( Pune Traffic ) सरासरी पातळी 71 टक्के इतकी नोंदवण्यात आली असून, शहरातील वाहनांचा सरासरी वेग केवळ 18 किलोमीटर प्रतितास इतकाच राहिला आहे. त्यामुळे अवघ्या 15 मिनिटांत पुणेकरांना केवळ 4.5 किलोमीटरचे अंतर पार करता येत आहे.
टॉमटॉमच्या अहवालानुसार, पुण्यात 10 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटे 20 सेकंद लागतात. विशेष म्हणजे, हा वेळ 2024 च्या तुलनेत 11 सेकंदांनी अधिक आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत 10 किलोमीटर अंतरासाठी 38 मिनिटे 13 सेकंद, तर संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये तब्बल 41 मिनिटे 40 सेकंद लागल्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : शिक्षण, आंदोलन, सोशल मीडिया… मुंबईत GEN-Z समोर मोहन भागवत
पुण्यात वाहतूक कोंडीची नेमकी परिस्थिती काय? ( Pune Traffic )
अहवालात पुण्यातील 16 ऑक्टोबर 2025 हा दिवस सर्वाधिक वाहतूक कोंडीचा दिवस म्हणून नमूद करण्यात आला आहे. त्या दिवशी केवळ 2.7 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल 15 मिनिटांचा वेळ लागला. तसेच ऑगस्ट 2025 हा सर्वाधिक वाहतूक कोंडीचा महिना ठरला असून, त्या महिन्यात वाहतूक कोंडीची पातळी 79 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. याउलट मार्च 2025 मध्ये सर्वात कमी वाहतूक कोंडीची नोंद झाली.
जगातील वाहतूक कोंडीच्या क्रमवारीत मेक्सिको सिटी पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर बंगळुरू दुसऱ्या, आयर्लंडमधील डब्लिन तिसऱ्या, पोलंडमधील लॉड्झ (Łódź) चौथ्या आणि पुणे पाचव्या स्थानावर आहे. भारतातील बंगळुरूनंतर पुणे हे वाहतूक कोंडीच्या समस्येने सर्वाधिक त्रस्त शहर ठरल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पुण्यात वाढणारी लोकसंख्या, वाहनांची प्रचंड संख्या, रस्त्यांची मर्यादित क्षमता, सुरू असलेली मेट्रो आणि इतर विकासकामे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनात सुधारणा, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे आणि रस्ते व्यवस्थापन प्रभावी करणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.








