• Home
  • महाराष्ट्र
  • माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी उजळला ज्ञानोत्सव; पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
Pune

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी उजळला ज्ञानोत्सव; पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चाणक्य नीती या वस्तू दान केल्यास गरीब व्यक्ती देखील होऊ शकतो करोडपती 3 1

पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर २०२५ : ज्ञान, विज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे थोर शास्तज्ञ, भारतरत्न,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, सुप्रसिद्ध कवी अशोक गायकवाड, महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शिक्षक जीवन ढेकळे, योगिता कोथावले, उज्ज्वला साटकर, शर्मिला काराबळे, रविंद्र ओव्हाळ, विशाल रेंगडे, सीमा जाधव, निलेश लांडगे यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

विद्यार्थी, नागरिक यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि डिजिटल युगातही पुस्तकप्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने ‘कविसंमेलन’, ‘सोशल मीडियाद्वारे वाचनास प्रोत्साहन देणारे संदेश’, ‘मराठी वाचन कट्टा – डिजिटल वाचनाची नवी दिशा’, ‘मराठी साहित्याचे डिजिटल प्रसारण’ तसेच ‘विकिपीडियावर मराठी लेखन वाढविण्यासाठी कार्यशाळा’ असे विविध उपक्रम यानिमित्ताने पार पडले,आलेल्या मान्यवरांचे संत गाडगेबाबा यांचे जीवनावर आधारित पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

कवी अशोक गायकवाड यांनी सादर केलेल्या ‘परी सारखी दिसायची तू…’, ‘कळे ना कसा हा जगावेगळा मी…’ अशा विविध भावस्पर्शी कविता उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे मार्गदर्शन,कविता तसेच गझल सादरीकरणाने वातावरणात रसिकतेचा आणि साहित्यप्रेमाचा सुरेल संगम घडून आला. वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, भारत हा महापुरुषांची खाण आहे. प्रत्येक महापुरुष हा वाचनामुळे घडला आहे. भारतातील वाचन संस्कृती, गायन संस्कृती, लेखन संस्कृतीचे विदेशात देखील अनुकरण केले जाते. प्रत्येकाने साहित्यवाचनास प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाचनामुळे आपला दृष्टिकोन व्यापक होत असतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी कविता आणि गझल या काव्यप्रकाराची सविस्तर माहिती दिली. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ या गाण्याचे सादरीकरणदेखील त्यांनी केले.

वाचन म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करणे नव्हे

किरण गायकवाड यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातील विविध उदाहरणांचे दाखले देताना सांगितले की, वाचन म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करणे नव्हे, तर आपल्या आजूबाजूला असणारी माणसेदेखील वाचता आली पाहिजेत. वाचनाची जिज्ञासा ठेवा. स्वतःच्या सामर्थ्याच्या, जिद्दीच्या आणि बुद्धीच्या बळावर यश मिळवण्यासाठी वाचन दिनासारखे उपक्रम उपयोगी ठरतात. वाचनामधून प्रेरणा निर्माण व्हावी, या हेतून आजच्या दिवसाचे आयोजन केले आहे. महापालिका वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विचारांची देवाणघेवाण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. वाचनाची प्रेरणा हीच खरी प्रगतीची बीजे आहेत. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याची भावना जागृत होण्यासाठी वाचन महत्त्वपूर्ण ठरते, असेही ते म्हणाले.

ज्ञानाचा शोध घेण्यासाठी वाचनासारखा दूसरा प्रभावी मार्ग नाही

‘प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी नियमित वाचन करणे गरजेचे आहे. वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्त्व घडविण्याची दिशा आहे. आजच्या डिजिटल युगात माहितीचा अमर्याद साठा उपलब्ध आहे, तथापि ज्ञानाचा शोध घेण्यासाठी वाचनासारखा दूसरा प्रभावी मार्ग नाही. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘स्वप्न पाहा आणि त्यांना साकार करा’ हा संदेश दिला. त्या स्वप्नपूर्तीसाठी वाचन हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाने रोज काही मिनिटे पुस्तकांशी संवाद साधण्याची सवय लावली, तर समाजात विचारशीलता आणि प्रगल्भता वाढेल असे मत प्रफुल्ल पुराणिक यांनी व्यक्त केले त्याचबरोबर त्यांनी भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल सविस्तर माहितीही दिली.

यावेळी उज्ज्वला साटकर, जीवन ढेकळे, योगिता कोथावले यांनी विविध कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य शशिकांत पाटील यांनी वाचनाचे महत्त्व, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांची प्रेरणा आणि ज्ञानप्रकाशाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. सूत्रसंचालन निलेश लांडगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts