• Home
  • राजकारण
  • काँग्रेस मूळ असलेल्या नेत्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभाग, राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र

काँग्रेस मूळ असलेल्या नेत्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभाग, राजकीय चर्चांना उधाण

varsha 29

सोलापूर: विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सोलापुरात पार पडले. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि मुळचे काँग्रेसचे असणारे जयकुमार गोरे यांनी संघाचा गणवेश परिधान करून पथसंचलनात सहभाग घेतला. जयकुमार गोरे यांच्यासोबतच भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील संघाच्या पथसंचलनात सहभाग घेतला होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सध्या भाजपमध्ये आहेत. असे असले तरी जयकुमार गोरे आणि सोलापूर शहराचे भाजप आमदार हे दोन्ही नेते मूळ काँग्रेसच्या तालमीत तयार झाले आहे. जयकुमार गोरे हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर भाजप आमदार देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे याआधी ते तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.

कोण आहेत जयकुमार गोरे?

जयकुमार गोरे पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २००९ ला ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये जयकुमार गोरे काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. तर एकूणच जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता ग्रामविकास मंत्री असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे.

कोण आहेत देवेंद्र कोठे?

देवेंद्र कोठे हे मूळ काँग्रेसच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. तर देवेंद्र कोठे यांचे आजोबा विष्णूंपंत कोठे यांनी आयुष्यभर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय होते. देवेंद्र कोठे यांचे काका महेश कोठे यांनी देखील काँग्रेससोबत आयुष्य घालवले.

देवेंद्र कोठे हे पहिल्यांदा 2017 साली प्रभाग 7 मधून शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकी अगोदर देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आलेले योगी आदित्यनाथ यांच्या सोबत देवेंद्र कोठे यांनी आक्षेपार्ह भाषण केले. या भाषणानंतर देवेंद्र कोठे प्रसिद्धी झोतात आले. त्यानंतर, नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी भाजप तिकीटावर सोलापूर शहर मध्यची निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

एकूणच, काँग्रेस मूळ असलेल्या या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलनात भाग घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts